सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली होती. दरम्यान, १० दिवसांत ३ हजार ७०३ वाहनधारकांवर २ कोटी ४५ लाख ८ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात सर्वाधिक कारवाई लायसन्स नसणारे व सीट बेल्ट न लावलेल्या वाहनधारकांवर केली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनधारकांना चांगलेच महागात पडत आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे (सुधारित) नवीन दराने दंडाची आकारणी होत असून, ही वाढ दुप्पट ते चौपट करण्यात आली आहे. विना लायसन्स वाहन चालविल्यास आता चक्क ५ हजारांचा दंड ठोठावला जात आहे. तसेच दंड न भरल्यास न्यायालयीन खटलेही दाखल करण्याची प्रक्रिया वाहतूक शाखेने सुरू केली आहे.
---------
दहा दिवसांत करण्यात आलेला दंड...
- - वेग मर्यादा उल्लंघन - २६३ - ५,२६,०००
- - पोलिसांनी केलेल्या इशाऱ्याचे पालन न करणे - ६९१ - ३,४५,०००
- - ट्रिपल सीट - १२८ - १,२८,०००
- - विना हेल्मेट - ३१४ - १,५७,०००
- - वैध लायसन्स सादर न करणे - ९६२ - ६,९८,५००
- - वैध लायसन्सशिवाय वाहन चालविणे - ४० - २,००,०००
- - सीटबेल्ट न लावणे - ९४३ - १,८८,६००
- - अतिरिक्त प्रवासी वाहतूक - २५१ - ६२,२००
- - विमा नसणे - २६ - ५२,०००
- - वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - ६५ - १,०१,०००
---------
वाहन चालविताना मोबाईल कशाला?
शहर व ग्रामीण भागात कित्येक वाहनधारक वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळून आले आहेत. या वाहनधारकांरवर मोठी कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात आली. शिवाय हेल्मेट नसणे, विमा नसणे, पीयूसी नसणे आदी विविध कारणांमुळे वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.
----------
सर्वच रस्त्यावर वाहतूक पोलीस
सोलापूर शहरापासून जाणाऱ्या सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक शाखेचे पोलीस वाहनधारकांवर कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजापूर, सोलापूर-बार्शी, सोलापूर-पुणे, सोलापूर-मंगळवेढा आदी महामार्गांवर वाहतूक शाखेची विविध पथके कार्यरत आहेत.
-----------
वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे हा साधा सरळ नियम आहे. वाहनधारकांकडे सर्व कागदपत्रे असल्यास दंड करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर कारवाईची मोहिम वेगात सुरू आहे. त्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहे.
- मनोजकुमार यादव, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण.