आता सुरू झाली मतदारांची मनवणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:50+5:302021-01-08T05:11:50+5:30
करमाळा : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची रंगीत तालीम ...
करमाळा : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. तालुका पातळीवरील नेतेमंडळींनी गावपातळीवर प्रचारात लक्ष घातल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात कामधंद्याच्या निमित्ताने किंवा नोकरीनिमित्त गावाकडून शहराकडे गेलेली मंडळी ‘गड्या आपुला गाव बरा’ असे समजून गावाकडे आल्यानंतर त्यांना गावबंदी केली गेली. त्यामुळे बहुतांश जणांनी गावाकडे येण्याचेही टाळले होते.
आता ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गावपुढाऱ्यांना व गावकऱ्यांना त्यांची आठवण आली असून, ‘ताई, माई, दादा, भाऊ, गावाकडे कधी येणार?’ या वेळेस तरी गावी यावंच लागेल, जाण्या-येण्याच्या खर्चाबरोबरच इतरही बंदोबस्त केला जाईल’, असेही सांगितले जात आहे.
करमाळा तालुक्यातील सालसे व जेऊरवाडी या दोन ग्रमपंचायत बिनविरोध झाल्या असून, ४९ ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असले तरी, मीच सरपंच होणार ! अशा आविर्भावात सर्वजण वावरू लागले आहेत. त्यातच या निवडणुकांकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीची पूर्वतयारी समजली जाऊ लागल्याने तालुका पातळीवरील नेत्यांनी याकडे जातीने लक्ष दिले आहे.
करमाळा तालुक्यात निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कुंभेज, अर्जुननगर, हिवरवाडी, मांगी, मिरगव्हाण, पाडळी, पांडे, पांगरे, पाथुर्डी, पोटेगाव, सांगवी, सरपडोह, शेलगाव (क), आळजापूर, बाळेवाडी, देवीचामाळ, गुळसडी, सौंदे, वडगाव, पुनवर, देवळाली, शेटफळ, बोरगाव, बिटरगाव श्री, पोथरे, घारगाव, हिवरे, निमगाव हवेली, उमरड, सावडी, मलवडी, भोसे, रोशेवाडी, फिसरे, करंजे, ढोकरी, कविटगाव, साडे, कोंढेज, कुगाव, कोळगाव, जातेगाव, पिंपळवाडी, दिलेश्वर, झरे, आळसुंदे, नेरले, केडगाव, हिसरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
----
आता गावाकडं आलं तर चालंल का?
पुण्या-मुंबईकडे गेलेल्या मंडळींना गावपुढारी, पॅनलप्रमुख, उमेदवार त्यांना आता फोनद्वारे संवाद करून गावाकडे येण्यासाठी विनवणी करू लागले आहेत. ‘आम्ही अडचणीत होतो तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला निराश केले होते, आता आम्ही गावाकडे आलो तर त्यांना चालेल का’, असा प्रतिप्रश्न ते विचारू लागले आहेत. त्यामुळे फोन करणाऱ्याची पंचाईत होऊ लागली आहे. त्यामुळे असे मतदार मतदानासाठी येणार? का? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.