चांदोली अभयारण्यातून भरकटलेल्या जंगली रानगव्यांचे २२ रोजी सायं. ५ च्या सुमारास अचानक कमलापूर ता. सांगोला येथे विनायक अनुसे यांच्या मक्याच्या पिकात दिसला. त्यानंतर त्यांच्यासह ग्रामस्थांनी या रानगव्याला हुसकावून लावताना त्याने म्हशीला धडक दिल्याने खरचटले होते. दरम्यान जंगली रानगव्याच्या सांगोला तालुक्यातील घुसखोरीचा लोकमतमधून सलत तीन दिवस पाठपुरावा केल्याने शेतकरी ग्रामस्थांना त्यांचा ठावठिकाणा समजू शकला.
दरम्यान त्या जंगली रानगव्यांने सोमवार रात्रीपासून कमलापूर, गोडसेवाडी, वासुद, कडलास, जवळा असा तीन दिवसांचा प्रवास करीत बुधवारी रात्री ११ च्या सुमारास डिकसळ अंतर्गत हबिसेवाडी येथील नेताजी भोसले यांना त्यांच्याच शेतात दिसला. रानगवा आपल्या परिसरात आल्याचे समजताच भोसले वस्ती येथील बाळू सावंत नेताजी भोसलेसह १० ते १५ तरुणांनी फटाके फोडून दुचाकी मागे लावून तेथून त्याला हुसकावून लावताना त्याने श्वानाला लाथ मारल्याने फरफटत गेले. त्या रानगव्याने पुढे धावतच मध्यरात्री १च्या सुमारास येळवी ता. जत हद्दीतील आवटेमळात गेल्याने सर्वजण माघारी परतले.
वनविभागाची जनजागृती...
सांगोला येथील वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनंजय देवकर, सहा. वनपाल बी. जे. हाके, वनपाल खंडेभराट, वाहन चालक स्वप्नील दौंड यांनी वन विभागाच्या शासकीय वाहनावरील स्पीकरद्वारे रान गव्याला कोणीही त्रास देऊ नका, हुसकावून नका किंवा मारहाण न करता सांगोला येथील वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करीत जनजागृती केली. तो रानगवा पुढे सरकू नये म्हणून कडलास, मेडशिंगी, आलेगाव परिसरात १० वन कर्मचारी त्याच्या शोधासाठी सतर्क होते, मात्र त्या रानगव्यांनी अचानक डिकसळ परिसरात पलायन केल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला.
फोटो
२५सांगोला-रानगवा
चांदोली अभयारण्यातून आलेला हाच तो जंगली रानगवा बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हबिसेवाडी येथील भोसलेवस्ती येथून पुढे जत जि.सांगली हद्दीत गेला.