सोलापूर : उजनी, टाकळी आणि शहरातील पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन सणाच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही भागातील पाणी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गंगाधर दुलंगे यांनी कळविले आहे.
बुधवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात वादळी वाºयासह पाऊस झाला. यामुळे रात्री ८.२० ते ११ या काळात टाकळी पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाला. तसेच उजनी पंपगृहाचा वीजपुरवठा बुधवारी मध्यरात्री १ ते गुरुवारी सकाळी साडेदहा असा सुमारे १० तास वीजपुरवठा खंडित झाल्याने पाकणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागला. दुपारी ३ वाजता पाणी पोहोचते न तोच पुन्हा गुरुवारी सायंकाळी ५ ते ५.२० या काळात उजनी पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे जलवाहिनी भरून पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब झाला. इकडे हिप्परगा तलावात डबल पंपिंगच्या यंत्रणेचा वीजपुरवठा बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत खंडित झाला.
शहराला पाणीपुरवठा करणाºया उजनी, टाकळी व हिप्परगा या तीन पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी उपशावर परिणाम झाला. त्यामुळे गुरुवारी दयानंद, कस्तुरबा टाकीवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अडचणी आल्या. रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे शुक्रवार दि. ५ आॅक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होणार आहे. मेडिकल पंपगृहावरून बुधवारी बापूजीनगर, संगमेश्वरनगर, पडगाजी नगराचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या भागाला ५ आॅक्टोबर रोजी पाणी दिले जाणार आहे.
शनिवारी पाणी...- जुळे सोलापुरातील उंचावरील टाकीतून होटगी रोड, विमानतळ, साखर कारखाना परिसरात शुक्रवारी पाणी सोडण्यात येणार होते. पण या अडचणीमुळे आता शनिवारी पाणी सोडले जाणार आहे. हद्दवाढ भागात पाणी अवेळी व कमी दाबाने येणार आहे. तसेच हे दोन भाग वगळता इतर ठिकाणी तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.