कमजोर हूं मगर मजबूर नहीं.. जीता हूं शान से..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:48 AM2019-12-05T11:48:21+5:302019-12-05T12:03:08+5:30
सोलापुरातील दिव्यांग दस्तगीर शेख यांची प्रेरणादायी कहाणी : दिव्यांग असूनही फॅब्रिकेशनचे करतात काम
सोलापूर : स्टील फर्निचर अर्थात फॅब्रिकेशनचे काम अवघड असते़ या लोखंडी फॅब्रिकेशनच्या कामाला सुदृढ माणसाचेही बळ कमी पडते़ अशा अवजड कामावर नई जिंदगी येथील दस्तगीर चाचांनी मात केली़ अत्यंत सुबक आणि आकर्षक स्टील फर्निचर तयार करण्याचे काम ते अत्यंत जिद्दीने करताहेत. चाचा आज पन्नाशीत पोहोचलेत. प्रचंड आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी यातून चाचा स्वावलंबी झालेत़ नुसते स्वावलंबी न होता त्यांनी फॅब्रिकेशनचा मोठा व्यवसाय देखील थाटला आहे.
दस्तगीर सत्तार शेख असे या जिद्दी चाचाचे नाव आहे़ ते नई जिंदगी येथील शोभादेवी नगरात राहतात़ येथेच त्यांचा साईबाबा स्टील फर्निचर फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू आहे़ या कामात त्यांचा मुलगाही सक्रिय आहे़ काही वर्षांपूर्वी चाचांच्या धर्मपत्नीचा मृत्यू झाला़ त्यानंतर त्यांनी एका अंध महिलेशी दुसरा विवाह केला आहे़ त्यांना दोन मुले आहेत़ त्यांच्या या उदार दृष्टिकोनाचेही समाजातून कौतुक झाले.
दस्तगीर चाचा जन्मत: उजव्या हाताने दिव्यांग आहेत़ तसेच वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला़ यात त्यांचा उजवा पाय पूर्ण निकामी झाला़ उजव्या हाताने आणि पायाने दिव्यांग झाल्यानंतरही चाचांनी जिद्द सोडली नाही़ घरची परिस्थिती बेताचीच होती़ त्यामुळे त्यांना शिकता आले नाही़ याउलट त्यांची बुद्धी आणि कल्पकता यातून ते स्टील फर्निचर व्यवसायात कुशल कारागिर बनले़ या व्यवसायात ते कसे आले या विषयी सांगताना चाचा बोलतात, लहानपणापासून मी आम्रपाली हॉटेल येथील दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात कामाला जात होतो़ या ठिकाणी मला फर्निचरचे काम शिकायला मिळाल़े.
वयाच्या वीस वर्षांनंतर मी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला़ खूप आर्थिक अडचणी आल्या़ पूर्वी छोटे काम करायचो़ लोक टिंगलटवाळी, चेष्टा करायचे़ दु:ख वाटायचे़़ परंतु हिंमत हारू नये, हे माझ्या आई-वडिलांनी शिकवलेले होते़ त्यामुळे मी कष्ट करत राहिलो़ आज सोलापुरातील बडे उद्योजक माझ्याकडून स्टील फर्निचरची कामे करून घेतात़ या व्यवसायातून मी रोज हजार ते पंधराशे रुपये कमावतोय़
अष्टपैलू चाचा...
- लोखंडी कपाट, खुर्च्या, टेबल, दरवाजे, गेट, जीना, मंगल भांडार साहित्य, बफे स्टँड, पत्राशेड मारणे, बिल्डिंगची कामे, चपाती शेंगड्या, इलेक्ट्रॉनिक शेंगड्या यासह स्टील फर्निचरची अनेक कामे चाचा करतात़ त्यांचे काम लोकांच्या पसंतीस उतरत असल्याने त्यांच्या कामांना मोठी मागणी येत आहे़ त्यांच्या व्यवसायाकरिता त्यांनी सोलापूर महानगरपालिकेला अल्पदरात शासकीय जागेची मागणी केली होती़ तसे निवेदन पालिकेच्या अनेक आयुक्तांना दिले़ जिल्हाधिकाºयांना दिले़ लोकप्रतिनिधींनाही दिलेत़ याचा काहीच उपयोग झाला नाही़ माझी जागा खरेदीची क्षमता नाही़ त्यामुळे मला शासनाकडून जागा मिळावी, अशी मागणी चाचांची आहे़