राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत वेट अॅन्ड वॉच परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:52 AM2019-11-12T10:52:24+5:302019-11-12T10:54:35+5:30
१५ डिसेंबर रोजी झेडपी अध्यक्षासाठी आरक्षण: राष्ट्रवादी काँग्रेसला सेनेची मिळणार का साथ
राजकुमार सारोळे
सोलापूर : राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नाट्यमय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाशिवआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तर जिल्हा परिषदेत आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल काय याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १५ डिसेंबर रोजी आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात अध्यक्षपदाची निवड होणार आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले संजय शिंदे यांनी भाजपच्या मदतीने अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे संख्याबळ जास्त असतानाही भाजपने सेना, काँग्रेस, स्थानिक आघाडी आणि अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली. आता नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपने निवडणुकीअगोदर तयारी सुरू केली होती. निवडणुकीनंतरही आपली सत्ता कायम राहील या आत्मविश्वासाने भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करण्याची तयारी केली होती.
पण गेल्या पंधरा दिवसात राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे आता स्थानिक राजकारणालाही कलाटणी मिळणार असे चित्र दिसत आहे. राज्यात सत्तेवर येणाºया महाशिवआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली तर जिल्हा परिषदेत साहजिकच राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. काँग्रेस, सेनेचेही सदस्य सोबत आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे े संख्याबळ वाढणार आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला विरोधी पक्ष म्हणून भूमिका सांभाळावी लागणार आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीआधी बरीच फाटाफूट झाली आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्यासोबत राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची बाजू कमकुवत झाली आहे. जर आता महाशिवआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तर जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरणे बदलतील असे बोलले जात आहे. सोमवारी संजय शिंदे जिल्हा परिषदेत येणार असा निरोप होता. पण मुंबईतील घडामोडीमुळे ते आलेच नाहीत. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेते तानवडे, बांधकाम सभापती डोंगरे कार्यालयात उपस्थित होते.
राष्ट्रवादीला असा फायदा
झेडपीच्या ६८ जागांपैकी संजय शिंदे आमदार झाले आहेत, एक सदस्य कारागृहात आहे. त्यामुळे ६६ जागांच्या संख्याबळावर नवीन अध्यक्ष निवडला जाईल. पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस: २३, काँग्रेस: ७, शिवसेना: ५, भाजप: १४, परिचारक गट: ३, डोंगरे गट: ३, शहाजीबापू पाटील गट: २, शेकाप: ३, आवताडे गट: ३, साळुंखे गट: २ व इतर :१. आता राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस, शिवसेना, शहाजीबापू पाटील गट, शेकाप व इतर सदस्य राहतील. त्यामुळे अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी सहज पोहोचणे शक्य होणार आहे. राष्ट्रवादीकडे ४० सदस्य आहेत, असा दावा प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. राज्यातील बदललेल्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेतही सत्ताबदल दिसेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनीही व्यक्त केला आहे.
भाजपचे वेट अॅन्ड वॉच
- पक्षनेते आनंद तानवडे यांनी राज्यातील सत्ताबदलाच्या स्थितीवर भाष्य करताना वेट अॅन्ड वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे. या परिस्थितीचा जिल्हा परिषदेत फरक पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीची ताकद वाढणार असली तरी मोहिते-पाटील गटाच्या आठपैकी ६, पाटील गटाच्या ४ पैकी ३ सदस्य आमच्याबरोबर येतील, असा विश्वास आहे. गतवेळेस भाजपने परिचारक, डोंगरे, शहाजीबापू, आवताडे व अपक्षांच्या मदतीने सत्ताबदल केला होता. झेडपीत महाआघाडी कायम राहील, असा आशावाद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.