म्हणत बळीराजानं टोमॅटो फेकला रस्त्यावर !
मारुती वाघ
मोडनिंब : लाखाहून अधिक खर्च केला; पण भाव गडगडला आणि मातीमोल किमतीने तो विकावा लागत असल्याने शेटफळच्या शेतकऱ्याने ‘घरी नेऊन तरी काय करू म्हणत खरेदीला आणलेला टोमॅटो चक्क रस्त्यावर फेकून देणे पसंत केले, आणि त्याला रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. बुधवारच्या मोडनिंब बाजारात हे चित्र पाहायला मिळाले.
मोडनिंब व परिसरात माळशिरस, पंढरपूर, माढा या तालुक्यात शेतकरी टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. इथल्या टोमॅटो खरेदीसाठी दिल्ली, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशचे व्यापारी येतात. दररोज ३० ते ४० मालट्रक टोमॅटो खरेदी केला जातो. त्यात भावही चांगला मिळतो मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटो खरेदीस पंधरा दिवस झाले असताना सुरुवातीला १६ ते १८ रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत असे. मात्र बुधवारी दोन ते तीन रुपये किलो दराने टोमॅटोला मागणी झाल्यामुळे शेटफळच्या आप्पाराव कोळी या शेतकऱ्याने हा टोमॅटो परत घेऊन न जाता रस्त्यावर टाकून घराकडे निघून गेला.
काहीही असो; पण गेल्या दोन वर्षांपासून ऊस पीक वगळता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कोणत्याही शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे अगोदरच कर्जबाजारी असणारा शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. कधी भाव नसल्यामुळे तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सतत अडचणीत सापडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
-----
माझ्याकडे एक एकर टोमॅटो असून त्याचा खर्च शेतामध्ये शेणखत, मशागत, रोपे खरेदी, बांधणी, फवारणी, रासायनिक खते, मजुरी असा एक लाखाहून अधिक आला. दोन ते तीन रुपये किलो दराने व्यापाऱ्यांनी मागणी केल्यामुळे मी रस्त्यावर टोमॅटो ओतून घरी निघून आलो.
- आप्पाराव कोळी, शेतकरी, शेटफळ
-----
यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यासह नाशिक भागातील कमी पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन वाढले आहे. यामुळे व बाजारात आवक भरपूर झाल्यामुळे दर कोसळले आहेत. दर वाढतील अशी अपेक्षा करू यात.
- अतुल काळे, व्यापारी, खरेदीदार
----