सोलापूर: जिल्ह्यात ढगाळी हवामान निर्माण झाल्यामुळे व बाजार समितीला सलग तीन दिवस सुटी असल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी ९५० गाड्या कांदा विक्रीला आणला. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर बाजार समितीतील गेल्या तीस वर्षातील हा विक्रम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात रविवारपासून ढगाळी हवामान निर्माण झाले आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा सोमवारी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत आणला. रविवारी मध्यरात्रीनंतर बाजार समितीतील पीकअप, टेम्पो व ट्रकच्या रांगा लागल्या. सोमवारी मार्केट समितीचे सर्व विभागाचे आवार कांद्याच्या गाड्यांनी व्यापून गेले. त्यामुळे किराणा व भुसार मालाची चढ-उतार करणे अवघड झाले. बाजार समितीत कांद्याचे लिलाव उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची ही दुसरी वेळ आहे. सकाळच्या सत्रात कांदा अडीच हजार ते २६०० प्रतिक्विंटल विकला गेला. त्यानंतर दुपारनंतर प्रतिसाद व गाड्यांची संख्या जास्त असल्याने भाव दोन हजार ते २३०० पर्यंत खाली आला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात कांद्याचा भाव तीन हजार ते ३९०० पर्यंत गेला होता; पण आवक वाढल्याने कांद्याचे भाव खाली आले आहेत.
संक्रात व सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेमुळे बाजार समितीने १२,१३ व १४ जानेवारी अशा सलग तीन दिवस सुट्या जाहीर केल्या आहेत. सुटीमुळेही कांद्याची आवक वाढली आहे; पण ढगाळी हवामानामुळे पाऊस येण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत कांदा आणला, अशी माहिती व्यापारी सिद्रामप्पा हुलसुरे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कांदा साठवणीची यंत्रणा नाही. गेल्या आठवड्यात भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची काढणी केली होती. भाव वाढेल तसे हा कांदा बाजारात पाठविला जाणार होता; पण अचानक ढग भरून आल्याने नुकसानाच्या भीतीने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घोडेगाव, नगरलाही कांदा पाठविला आहे.
सुटीमध्ये केली वाढ
कांद्याची मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत आवक झाल्याने लिलाव झालेला कांदा बाहेर हलविणे गरजेचे आहे. कांद्यांच्या गाड्यांमुळे किराणा व भुसार मालाची बाजारपेठ थांबली आहे. त्यामुळे ही वाहने बाहेर जाण्यासाठी मंगळवार, ११ जानेवारी रोजीसुद्धा बाजार समितीला सुटी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पिंक तुरीच्या भावात वाढ
बाजारपेठेत नवीन तुरीची १२० गाड्या आवक झाली. आवक जादा असली तरीही तुरीच्या भावात वाढ झाली आहे. पिंक तुरीच्या भावात ३०० रुपयांनी तर लाल तूर शंभर रुपयांनी वाढली आहे. नवीन तूर ५५०० ते ६३००, पिंक: ५८०० ते ६६५०, तूर जुनी लाल: ६००० ते ६४००, पिंक: ६००० ते ६३०.