सीईओ दिलीप स्वामी यांनी होटगी शाळेला अचानक भेट दिल्यावर काय घडलं; वाचा बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 09:16 AM2021-01-09T09:16:21+5:302021-01-09T09:16:55+5:30
सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळेवर शिक्षण परिषद होणार; सीईओनी काढले आदेश
सोलापूर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी होटगीच्या मराठी प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा सुरू आहे याची अचानक तपासणी केली. यावेळी शिक्षकांची धावपळ उडाली अन् पहिलीतील मुलीने सांगितलेल्या गोष्टीवरून सीईओ स्वामी आनंदित झाले आणि इतर शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी शनिवारपासून केंद्रप्रमुख कार्यालयात शैक्षणिक परिषद आयोजन करण्याचे आदेश दिले.
कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. हा कार्यक्रम झाल्यावर दोघांनी थेट जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेचा परिसर व शिक्षक करीत असलेल्या कामांची त्यांनी तपासणी केली. कोरोना काळात सुरू असलेल्या आॅनलाईन व आॅफलाईन अभ्यासाची माहिती शिक्षकांनी दिली. या अभ्यास पद्धतीचा विद्यार्थ्यांना खरोखरच फायदा होत आहे काय हे तपासण्यासाठी काही विद्यार्थी व पालकांना बोलावून आणण्यास त्यांनी सांगितले. तिसरीतील संजना बनसोडे हिने चिमणी व कावळ्याची गोष्ट सांगितली तर साक्षी सोनकडे व वर्षा बनगोंडे यांनी कविता म्हणून दाखविल्या.
पालक मल्लिकार्जुन बनगोंडे यांनाही सीईओनी काही प्रश्न विचारले. लॉकडाऊनकाळात मुलांना शाळा दुरावली. त्यानंतर आॅनलाईन व इतर माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षणाबाबत मुलं व पालक समाधानी आहेत का याची त्यांनी माहिती घेतली. आॅनलाईनद्वारे शिष्यवृत्तीची तयारी करणाºया चौथीतील वैशाली ढंगे हिच्याशी सीईओ स्वामी यांनी संवाद साधला.यावेळी शिक्षक वैशाली कुलकर्णी, सुनीता वनस्कर, शोभा चव्हाण, स्वाती स्वामी उपस्थित होते.
जिल्ह्यात १00 ठिकाणी परिषद
शैक्षणिक गुणवत्ता विकास व इतर विषयावर चर्चा व आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील १00 केंद्रावर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांनी या कार्यशाळेत हजेरी लावून मार्गदर्शन करावे असे परिपत्र सीईओ स्वामी यांनी जारी केले आहे.