साेलापूर - जे लाेक कधीच आमचे नव्हते. त्यांची आम्ही वाट का पाहावी. त्यांचा विचार का करावा, असा सवाल काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी उपस्थित केला.
काँग्रेसच्या माजी महापाैर नलिनी चंदेले, सुधीर खरटमल यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. याबद्दल आमदार शिंदे म्हणाल्या, हे लाेक काँग्रेस कमिटीचे सदस्य नव्हते. काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. या लाेकांनी काही वर्षांपूर्वीच काँग्रेस साेडली हाेती. त्यांचा विचार आम्ही का करावा. निवडणुकीच्या ताेंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचा काही लाेकांचा पॅटर्न असताे. ही गाेष्ट जनतेच्या लक्षात येते. जनतेला मुर्खात काढू शकत नाही. जनता आमच्यापेक्षा हुशार आहे. त्यामुळे काँग्रेस साेडणाऱ्या लाेकांबद्दल आम्ही बाेलणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
काेण काेठे उड्या मारतय हे जनतेला कळते
आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या परवाच्या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. पण निवडणुकीच्या काळात काेण काेठे किती वेळा उड्या मारतय हे जनतेच्या लक्षात येते. काँग्रेसच्या काम तळागाळात सुरू आहे. आम्ही उंटावर बसून शेळ्या राखत नाही. प्रत्येक गाेष्टीचे आम्ही भांडवल करीत नाही, असा टाेलाही त्यांनी लगावला.
आता राष्ट्रवादीचे लाेक फाेडा : करगुळे
काॅंग्रेस भवनात शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीचे लाेक काँग्रेसचे लाेक फाेडत आहेत. आपण राष्ट्रवादीचे लाेक फाेडले पाहिजेत, असे काँग्रेसचे युवक अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले. मागील निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे आणखी काही लाेक राष्ट्रवादीत जाणार असल्याची कुजबूज या कार्यक्रमात झाली.