सोलापूर - देशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला तरी, भाजपाकडून माढ्यातील उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे माढा लोकसभेतील जनतेला माढ्यातील भाजपाचा उमेदवार नेमका कोण ? असा प्रश्न पडला आहे. शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. अनेक राजकीय घडामोडींनंतर माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणारे संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा खुद्द पवारांनीच केली. मात्र, भाजपाकडून अद्यापही उमेदवार ठरला नाही. त्यामुळे कुणी उमेदवार देता का उमेदवार असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आला आहे.
संजय शिंदे यांनी आपला प्रचार शरद पवारांच्या 'पॉवर'च्या सहाय्याने सुरु केला असला तरी भाजपने आपला उमेदवार अद्यापही जाहीर न केल्याने त्यांना आपल्या विरोधी पक्षाचे म्हणजे भाजपचे उमेदवार कोण असेल याची वाट पाहावी लागत आहे. कारण, प्रचारासाठी टीका करताना नेमकी कुणावर करायची अन् कोणाला लक्ष्य करायचे हाही पेच संजय शिंदेंसमोर आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात केलेल्या चाचपणीत पवार विरोधी वातावरण पाहून पार्थ पवारांच्या उमेदवारी करीता मी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध करूनही त्यात मोहिते पाटलांचे नाव नसल्याने नाराज झालेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांना ही उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, त्यानंतर साताऱ्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपाच्या गळाला लागले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाकडून त्यांनाच उमेदवारी जाहीर होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र, भाजपाने त्यांचीही उमेदवारी जाहीर केली नाही.
मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात सरळ लढत होणार असल्याची दाट शक्यता असताना मधूनच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख व रासपचे महादेव जानकर यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्यात साताऱ्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाने निंबाळकर यांचे नाव सध्या उमेदवारीकरिता चर्चेत आहे. भाजपनेही यापूर्वी अंदाजे उमेदवारांच्या तीन याद्या प्रसिद्ध करूनही त्यात माढ्याची उमेदवारी जाहीर न झाल्याने माढ्यात भाजपचा उमेदवार कोण किंवा कुणी उमेदवार देता का उमेदवार, असा प्रश्न तेथील रणजितसिंह मोहिते पाटील समर्थक आणि जनता विचारत आहे.
दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही माझ्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या ठिकाणी पवारप्रेम दाखवू नका’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील समविचारी आघाडीच्या नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पण, नेमका प्रचार कुणाचा करायचा हाही प्रश्न कार्यकर्ते आणि समविचारी नेत्यांना सतावतो आहे.