पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाºया पतीला जन्मठेप; सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:13 PM2018-12-29T12:13:12+5:302018-12-29T12:14:25+5:30
सोलापूर : माहेरहून रिक्षा अन् घर घेण्यासाठी पैस न आणल्याने चिडून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाºया आरोपीस जिल्हा ...
सोलापूर : माहेरहून रिक्षा अन् घर घेण्यासाठी पैस न आणल्याने चिडून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाºया आरोपीस जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात ११ साक्षीदार तपासले. यात मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. बाबुराव शिवप्पा कोळी असे आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील आरोपी बाबुराव शिवप्पा कोळी (वय ३३, रा. कळके वस्ती, कारंबा नाका, सोलापूर) त्याची पत्नी (मयत) महादेवी हिला घटनेपूर्वी दोन-तीन वर्षांपासून रिक्षा व घर घेण्यासाठी मारहाण आणि छळ करीत असे. या प्रकाराबद्दल महादेवीचा भाऊ फिर्यादी अनिल व त्याच्या घरच्या लोकांनी समजावून सांगितले. यावरही त्याच्यात काही फरक पडत नव्हता. त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून भाड्याने घर घेऊन दिले. काही दिवस तो पत्नीशी व्यवस्थित वागला. पुन्हा छळ, मारहाण करण्यास सुरु केले. घटनेच्या दिवशी ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास कारंबा नाका, कळके वस्ती येथील घरी महादेवीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून गंभीर जखमी केले यातच तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयत महादेवीचा भाऊ अनिल मनोहर कोणे (रा. सम्राट चौक, माने वस्ती, सोलापूर) याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन सहायक पोलीस निरीक्षक चिंताकिंदी यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासले. यात आरोपीची मुलगी श्रद्धा कोळी व शेजारी बेगम शेख, जुमीवाले, तपास अधिकारी रमेश चिंताकिंदी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी साक्षीदार, पंच, डॉक्टर यांची साक्ष न्यायालयासमोर आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला भा. दं. वि. ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय पाच हजार रुपयांचा दंडही सुनावला.
या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड. शीतल डोके, मूळ फिर्यादीकडून अॅड. विनीत गायकवाड तर आरोपीतर्फे अॅड. एस. आर. गडदे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून दैवशाला मैंदाड यांनी मदत केली.