सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनसाठी बेल्लारी (कर्नाटक)च्या जिंदाल स्टीलमधून पाईप खरेदी करण्यात आले आहेत. हे पाईप १५ दिवसांत सोलापुरात पोहोचतील. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात होईल, असे सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात हैदराबादच्या पोचमपाड कंपनीला समांतर पाईपलाईनच्या कामाची वर्कआॅर्डर देण्यात आली. वर्षानंतरही या कामाला सुरुवात झालेली नाही. पाईपलाईन आणि जॅकवेलसह इतर कामांसाठी उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा तालुक्यांत तात्पुरते भूसंपादन करणे आवश्यक आहे. ते कामही प्रलंबित आहे. जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या वादात उजनी धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी जागा मिळालेली नाही. स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी मागील आठवड्यात विविध कामांचा आढावा घेतला.
पोचमपाड कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत बेल्लारी येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. ढेंगळे-पाटील यांच्यासह स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता कोळी आणि पोचमपाडच्या अधिकाºयांनी जिंदाल स्टीलच्या प्रकल्पाला भेट दिली.
प्रथम हे काम सुरू होईलजिंदाल स्टील कारखान्यात पाइपची तांत्रिक माहिती घेण्यात आली. पाइप लाइनचे काम तत्काळ मार्गी लागेल. उजनी धरण काठावर आवश्यक असलेली जागा उपलब्ध करुन देण्याचे काम महापालिका आणि जलसंपदा विभागाने तत्काळ करणे आवश्यक आहे. सोरेगाव ते पाकणी यादरम्यान आठ किलोमीटरचे काम करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. त्यामुळे प्रथम हे काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे.-त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी कंपनी.