१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता रमेश फुलारी हे बोरेगाव (दे) येथील स्वत:च्या शेतात काम करीत होते. इतक्यात त्यांना शेताच्या बांधावर एक मोर दिसला. तो निपचित का बसला आहे? असा प्रश्न पडला. जवळ गेले असता तो अजिबात उडून गेला नाही, घाबरलाही नाही. त्यांनाही नवल वाटले. जवळ गेले असता त्याच्या दोन्ही डोळ्याला दिसत नसल्याचे स्पष्ट झाले. जगण्यासाठी त्या मोराची धडपड सुरू होती. त्यांच्यात निरागस मोराविषयी माणुसकी जागी झाली. त्याचा नेमका आजार समजून घेत शुश्रूषा केली. तो मिटलेल्या पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होता. पंख फडफडले. पशुपक्षी तज्ज्ञांच्या मते त्याला हा कोईराजा नावाचा आजार जडल्याचे समजते. त्या मोराला थंड सावलीत आणत पाणी पाजले. त्याला खाद्य देत त्याच्यात ऊर्जा आणली.
आता प्रश्न पडला या मोराचे करायचे काय? रानात या अवस्थेत सोडले तर कुत्रे, रान मांजरे, वन्य प्राणी शिकार करतील. असाच प्रकार मागील दोन वर्षांपूर्वी बोरेगाव येथील अमोल फुलारी यांच्या निदर्शनास आला होता. अक्कलकोट वन विभागाच्या कार्यालयाला याची माहिती देण्यात आली. वन खात्याचे अधिकारी प्रकाश डोंगरे हे फुलारी यांच्या शेतात जाऊन मोराची पाहणी केली. त्यांनी मोराला ताब्यात घेतले.
-------
बोरेगाव येथे डोळे उघडण्याच्या अवस्थेमध्ये मोर आढळला आहे. घटनास्थळी जाऊन मोराला ताब्यात घेतले आहे. त्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सक्षम झाल्यानंतर त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देणार आहोत.
- प्रकाश डोंगरे
वन परिमंडल अधिकारी
---------
फोटो : ०४ बऱ्हाणपूर मोर
डोळे उघडण्याच्या स्थितीत नसलेल्या मोराची शुश्रूषा करताना रमेश फुलारी आणि वन अधिकारी.