अरे वा!.. म्हाडा उभारणार सोलापुरात भाजी मंडई अन् ‘फायर’ स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 05:24 PM2021-09-22T17:24:56+5:302021-09-22T17:26:55+5:30
अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय : अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण हाेणार
साेलापूर : म्हाडाने आरक्षित जागांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जुळे साेलापुरातील जागेवर भाजी मंडई तर विडी घरकूल येथील जागेवर अग्निशमन केंद्र उभारण्याची तयारी दाखविली आहे. याबद्दलची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे पत्र म्हाडाला लवकरच देण्यात येईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी लाेकमतला सांगितले.
आयुक्त पी. शिवशंकर आणि म्हाडाचे सीईओ नितीन माने यांची नुकतीच बैठक झाली. जुळे साेलापुरातील पाण्याच्या टाकीसमाेर म्हाडाची ३२०० चाैरस मीटर जागा आहे. या जागेवर भाजी मंडईचे आरक्षण आहे. विडी घरकूल भागात ५ हजार ४०० चाैरस मीटर जागा असून अग्निशमन केंद्राचे आरक्षण आहे. या जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात याव्यात अशी मागणी आयुक्तांनी केली. या जागा म्हाडाने विकत घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा माेबदला आवश्यक असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. मात्र विकास नियंत्रण नियमावलीनुसार या जागा विकसित करण्यात येतील. यातील ४० टक्के जागांवर आरक्षणानुसार बांधकाम करुन पालिकेच्या ताब्यात देण्यात येईल. उर्वरित जागेच्या वापराचे नियाेजन म्हाडा करेल, असे माने यांनी स्पष्ट केले. त्यानुसार महापालिका पत्र देईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
---
जुळे साेलापुरातील मुख्य रस्त्यावर भाजी मंडईची मागणी आहे. या रस्त्यावर अतिक्रमणही वाढले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई लवकरच सुरू हाेईल. म्हाडाच्या निर्णयामुळे जुळे साेलापुरात महापालिकेला नवी मंडई मिळेल. भाजी विक्रेते आणि नागरिकांची अनेक वर्षांची मागणीही पूर्ण करता येईल.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.
---------
आरक्षित जागांवर अतिक्रमण
डिमार्ट ते विजापूर राेड यादरम्यान डिपी राेडवर दुकाने टाकण्याचे काम राजकीय कार्यकर्ते करीत आहे. ही दुकाने राजकीय कार्यकर्ते वापरत नाहीत. मात्र ही दुकाने भाड्याने दिली जात आहेत. पालिकेच्या आरक्षित जागाही वापरात आणल्या जात आहेत. शासकीय मालकीच्या जागा भाड्याने देण्याचे उद्याेगही सुरू आहेत.