वारकऱ्यांच्या दिमतीला यंदा ५७ रुग्णवाहिका
By admin | Published: June 24, 2014 01:13 AM2014-06-24T01:13:58+5:302014-06-24T01:13:58+5:30
जि. प. ची आरोग्य यंत्रणा: इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस घेतेय विठ्ठलभक्तांची काळजी
सोलापूर:पंढरीत आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पायी चालत येत असतात. त्यांच्या आरोग्याच्या सोयीसाठी आणि अपघात झाल्यास तातडीची सेवा मिळावी यासाठी जि. प. चा आरोग्य विभाग सरसावला आहे. याच उद्देशाने पहिल्यांदाच ५७ रुग्णवाहिका वारी मार्गावर तयार ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय पंढरपुरात १२ ठिकाणी या रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत.
आषाढी वारीसाठी येणाऱ्या संत ज्ञानेश्वर व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत तसेच पंढरपुरात ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या ५७ रुग्णवाहिकांद्वारे अद्ययावत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांचा पंढरीत मेळा जमतो. मागील काही वर्षांपासून वारकऱ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. आषाढीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीक्षेत्र देहू तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरला निघते. पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांची संख्या वाढत जाते. एकादशीदिवशी तर पंढरपूर शहर वारकऱ्यांनी गजबजून जाते. ऐन पावसाळ्याचे दिवस व एकाच वेळी होणारी वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन आरोग्य सेवा तत्परतेने मिळण्यासाठी यावर्षी अधिक दक्षता घेण्यात आली आहे. पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत पालखीसोबत विविध ठिकाणी ५७ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.
नेमून दिलेल्या ठिकाणी या रुग्णवाहिका थांबणार असून रुग्णवाहिकामध्ये औषधोपचाराची संपूर्ण सुविधांची सोय केली आहे. सोलापूर जिल्ह्यात पालख्यांचा प्रवेश झाल्यानंतर या रुग्णवाहिका नियुक्त ठिकाणी थांबणार आहेत. पंढरपूर शहरात पालख्या आल्यानंतर त्या पंढरपूर शहरातील प्रमुख ठिकाणी थांबणार आहेत.
वाळवंटात थांबणार दोन रुग्णवाहिका
पालख्या पंढरीत दाखल झाल्यानंतर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या १२ रुग्णवाहिका शहरात विविध ठिकाणी थांबविण्यात येणार आहेत. मार्केट यार्ड (नवीन चंद्रभागा बसस्थानक), पोलीस स्टेशन, सावरकर पुतळा, रेल्वे स्टेशन, गोपाळपूर रोड, नवीन कराड नाका, इसबावी डेअरी, उपजिल्हा रुग्णालय, तीन रस्ता सोलापूर रोड (नदीच्या पलीकडे), सांगोला रोडवर प्रत्येकी एक तर वाळवंटात दोन रुग्णवाहिका थांबविल्या जाणार आहेत.
-----------------------
सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरांची संख्या पुरेशी आहेच. याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातील ६० वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे.
- डॉ. सुनील भडकुंबे
जिल्हा आरोग्य अधिकारी (जि. प.)
-----------------------------
जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा
४ सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा पालख्यांच्या सर्वच मार्गांवर ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गावर ९३ उपचार पथक असून प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक राहणार असल्याचे जि. प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील भडकुंबे यांनी सांगितले. याशिवाय पालखी मार्गावरील ४० आरोग्य केंद्रांचे ८० वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्या-त्या ठिकाणी सेवा बजावणार आहेत.