जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार; वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून मुक्ती !

By Appasaheb.patil | Published: August 19, 2022 03:55 PM2022-08-19T15:55:55+5:302022-08-19T15:56:03+5:30

महावितरण कंपनी सोलापुरात बसविणार स्मार्ट मीटर

You will get electricity as much as you pay; Freedom from the strife of increased electricity bills! | जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार; वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून मुक्ती !

जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार; वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून मुक्ती !

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : घरगुती वीज ग्राहकांना ऊर्जा कंपनीकडून लवकरच स्मार्ट मीटर मिळणार आहे. मोबाइल सीम कार्डप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आणि प्रीपेडमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांना जेवढा वीज वापर असेल तेवढे बिल अदा करावे लागणार आहे. याबाबतच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली असून, प्रारंभी मुंबई, पुणे व अन्य मेट्रोसिटीत हे मीटर बसविण्यास सुरुवात झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

दरम्यान, प्रीपेड मीटर अगदी मोबाइलच्या सीमकार्डसारखे काम करते. जसे आपल्याला महिन्याला कॉलिंग किंवा डेटा वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो. त्यानंतर ठरावीक दिवसांपर्यंत किंवा तुमच्या वापरानुसार रिचार्ज सुरू राहते. त्यानंतर संपते, तसेच वीज बिल प्रीपेड मीटरबाबत असणार आहे. या प्रीपेड वीज मीटरला आधी रिचार्ज करावे लागेल, त्यानुसार तुमच्या वापरानुसार पैशांची कपात होत राहणार आहे.

---------

स्मार्ट वीज मीटरचे फायदे

  • - मोबाइलच्या सीमकार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल.
  • - वीज वापरानुसारच बिल येईल, तसेच प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.
  • - स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये छेडछाड करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल, तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल.
  • - स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाण-घेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीत कमी वेळेत करता येईल.

--------

महावितरणचे आर्थिक गणित सुधारणार

सध्या वीज मीटरचे बिल दर महिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडविण्यासाठी आता स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटर लावल्याने वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, अशी आशा महावितरणने व्यक्त केली आहे.

-------

जानेवारीनंतर सोलापुरात बसविणार स्मार्ट मीटर

सध्या स्मार्ट मीटरच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच ती पूर्ण होईल. सप्टेंबर महिन्यात मुंबई, पुणे व अन्य शहरांत स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी २०२३ नंतर सोलापूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यास प्रारंभ होईल. सुरुवातील घरगुती ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.

---------

सोलापूर जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांची संख्या - ६ लाख ४६ हजार ९२३

-------

सुरुवातील घरगुती मीटर बदलणार

स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम जानेवारी २०२३ नंतर सोलापूर जिल्ह्यात सुरू होणार असल्याचे संकेत महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिले. सुरुवातीला घरगुती ग्राहकांचे मीटर बदलण्यात येतील, त्यानंतर औद्योगिक वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत. वाणिज्यिक, कृषी व अन्य ग्राहकांबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही.

 

Web Title: You will get electricity as much as you pay; Freedom from the strife of increased electricity bills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.