जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते, कारण निम्म्याहून जास्त भारतात तरुणांची संख्या आहे. याच तरुणांच्या जीवावर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २०२० साली भारत महासत्ता बनेल असे स्वप्न पाहिले. पण, हा तरुण आज चैनीच्या वस्तूमध्ये, प्रसारमाध्यमे, दूरदर्शन, मोबाईल, राजकारण व व्यसनाच्या नादी लागल्यामुळे इतका भरकटला गेला आणि आमचा तरुण इथेच उद्ध्वस्त व दिशाहीन झाला. आपला भारत महासत्ता होणार हे स्वप्न चिरडले.
आज चैनीच्या वस्तूंमुळे (मोबाईल,टीव्ही यांचा अतिरेकी वापर) तरुण वाचन करणे विसरला येथेच अर्धा तरुण उद्ध्वस्त झाला. तरुण पिढीला योग्य तो मार्गदर्शक मिळाला नाही. राजकीय नेत्यांनी, पक्ष-संघटनांनी तरुण पिढीच्या डोक्यात जाती-धर्म भरले आणि त्यांच्याकडून दंगली घडवून आणल्या. इतिहासाचे चुकीचे लेखन आणि त्याची तरुणांच्या समोर चुकीची मांडणी केली गेली. अशा अनेक कारणामुळे आजचा तरुण दिशाहीन झाला आहे.
तरुण म्हटलं की, आठवतं ते एक धगधगतं सळसळतं तरुण रक्त.. ज्याच्यामध्ये लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक असते. आजचा तरुण स्वत:ला डिफरंट समजतो, त्याची मानसिकता ही ग्लोबल आहे! बी प्रॅक्टिकल.. बी पर्टिक्युलर असं म्हणणारा हा वर्ग आहे, पण म्हणून डोळे झाकून कोणालाही फॉलो करू नये आणि आपण देखील समाजात घडणाºया या घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी लक्ष देऊन समाजविधायक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन भावी पिढीसमोर एक आदर्श निर्माण करुन त्यांना प्रेरणा देणे महत्त्वाचे आहे. आजचा तरुण ‘स्मार्ट’ आहे, आणि असलाच पाहिजे, पण स्मार्टनेस आणि झगमगाट यातला फरक देखील ओळखायला पाहिजे. केवळ करिअर, पैसा, ऐषआरामाची जिंदगी एवढंच महत्त्वाचं नाही तर आजूबाजूला घडणाºया गोष्टींविषयी विचारमंथन व स्वत:ची भूमिका या गोष्टी देखील आवश्यक आहेत, पण याचे दुर्लक्ष तरुणाई करत आहे.
तरुणांचे दिशाहीन तारुण्य आज व्यर्थ जात आहे. त्याच्यापेक्षा जास्त ते कुटुंबाला, समाजाला घातक होत आहे. तरुणांचा सळसळता उत्साह, बलदंड ताकदीने मुसमुसणारे शरीर तलवारीच्या दुधारी पात्यासारखे असते. त्यांना योग्य दिशेने वापरले तर शत्रूवर वार होतो आणि वापराची दिशा चुकली तर आत्मघात होतो. आज या तारुण्याचा उपयोग आणि वापर आत्मघातकीच जास्त प्रमाणात होत आहे आणि हो पुढारी लोक स्वत: च्या फायद्यासाठी करून घेत आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो वाहते पाणी उतार मिळेल त्या दिशेने वाहते त्याला योग्य ठिकाणी जाण्यासाठी बांधाची आणि पाटाची गरज असते. बेजबाबदार, बेफिकीर वृत्ती, ऐतखाऊ आणि आळशी स्वभाव, निष्क्रिय आणि उधळी, मानसिकता यापैकी एकाची जरी लागण जवानीला झाली की सगळे मुसळ केरात जाते. मार्ग दिसेना आणि वाट कळेना, बहुतांशी अशी अवस्था तरुणांची झालेली आहे. ध्येय व फळ ठरविले की किती वेगाने पळायचे.. हे निश्चित करता येते. ध्येय ठरविलेले आणि योग्य दिशा मिळालेले तारुण्य सर्वोत्तम फळ देणारे ठरते. तारुण्य व शक्ती ही नेहमी मार्ग शोधत असते, ज्याला वेळेवर याची किंमत कळाली, त्याचे जीवन सफल होते.
वेळ, काळ बदलला तसे दुनियाही बदलली. पाश्चात्य देशाचं अनुकरण करताना आमची तरुणाई मात्र स्वत:च्या देशाची आदर्श संस्कृती मात्र विसरत चाललेय. इंटरनेटने जग जवळ आले; मात्र माणसातील माणुसकी मात्र संपत चालली. संवेदना हरवलेली तरुणाई अडीच अक्षरी प्रेमात वेडी झालेली दिसते. तर दुसरीकडे जात, पात, धर्म यात अडकलेली तरुणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार? असा केविलवाणा प्रश्न पडतोय. आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्वाची. कन्फ्युज असलेल्या तरुणांना मार्ग दाखवण्याची. आजचा तरुण उद्याची दशा आणि दिशा ठरवणारा आहे. तरुणांना पेटवणारे व त्यांचा दुरुपयोग करून घेणारे खूप आहेत. तरुणांनी हे ओळखून ज्या त्या वयामध्ये त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तोपर्यंत वेळ निघून जाते आणि त्याची किंमत कळते.- प्रा. तात्यासाहेब काटकर(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)