पंढरपूर - येथील श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साह आणि भक्तीभावात झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाह सोहळ्यासाठी मंदिराच्या सभामंडपात मंदीर समितीचे सदस्य व कर्मचारी तसेच आदी मोजकेच लोक उपस्थित होते.
मंगळवार दि. १६ रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचीही लगीनघाई सुरू होती. विठ्ठल मंदिरातील सभामंडपात भव्य मंच सजवण्यात येत होता आणि त्याला आकर्षक फुलांची रोषणाई करण्यात आली होती. विठ्ठल आणि रखुमाईचा गाभारा विविध प्रकारच्या रंगीत, सुगंधीत फुलांनी लगीन घरासारखा सजवला होता. तर एरवी टाळ मृदंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने गजबजणार्या विठ्ठल मंदिरात मंगळवारी मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित व-हाडी मंडळी यांची लगबग होती. बाहेर सोन्याचे बाशिंग बांधून देवाचं लगीन लावण्यासाठी मोजकीच वर्हाडी मंडळी मोठ्या उत्साहाने या लग्नसोहळ्यास उपस्थित होती.
या विवाह सोहळ्यास मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य व नगराध्यक्षा साधनाताई भोसले, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी मंदिर समितीचे सदस्यांसह मोजकेच वर्हाडी मंडळी या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. विवाह सोहळ्यानंतर उपस्थित वर्हाडी मंडळींना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.