१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्याने सज्ज जिओनी एक्स१एस
By शेखर पाटील | Published: September 20, 2017 08:51 PM2017-09-20T20:51:27+5:302017-09-20T20:51:47+5:30
जिओनी कंपनीने तब्बल मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्याने सज्ज असणारा जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन १२,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर केला आहे.
मुंबई, दि. 20 - जिओनी कंपनीने तब्बल मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्याने सज्ज असणारा जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन १२,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर केला आहे.
जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन २१ सप्टेबरपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जिओनीने गेल्या महिन्यातच जिओनी एक्स१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला होता. प्रस्तुत मॉडेल याचीच सुधारित आवृत्ती आहे. हा स्मार्टफोन खरेदी करणार्या ग्राहकाला एयरटेल कंपनी सहा महिन्यांची वैधता असणारा १० जीबी डाटा मोफत देणार आहे. अर्थात यासाठी एक जीबीचे रिचार्ज करावे लागेल. याशिवाय पेटीएमनेही कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. शीर्षकात नमूद केल्यानुसार यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात ब्युटिफाईड व्हिडीओ आणि फेस ब्युटी २.० हे फिचर्स देण्यात आले आहेत. तर यातील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.
जिओनी एक्स १ एस या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. मीडियाटेक एमटी६७३७टी या प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलमध्ये तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येईल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड प्रणालीच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर जिओनी कंपनीचा अमिगो ४.० हा युजर इंटरफेस असेल. तर या मॉडेलमध्ये तब्बल ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.