आधारप्रमाणे प्रत्येक वाहनाला मिळणार विशिष्ट क्रमांक
By शेखर पाटील | Published: September 8, 2017 01:04 PM2017-09-08T13:04:53+5:302017-09-08T13:07:23+5:30
लवकरच आपल्या वाहनाला आधारप्रमाणे युनिक क्रमांक मिळणार असून याच्या माध्यमातून देशातील टोल नाक्यांवरील गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. आधारच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युनिक अशी ओळख मिळालेली आहे
लवकरच आपल्या वाहनाला आधारप्रमाणे युनिक क्रमांक मिळणार असून याच्या माध्यमातून देशातील टोल नाक्यांवरील गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. आधारच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युनिक अशी ओळख मिळालेली आहे. याच प्रकारची ओळख आता देशातील प्रत्येक वाहनाला मिळू शकते. केंद्रीय दळणवळण मंत्रालय आणि नॅशनल हायवे ऑथेरिटी ऑफ इंडिया म्हणजेच न्हाईने काही दिवसांपूर्वीच फास्टॅग ही प्रणाली सुरू केली आहे. यासाठी दोन स्मार्टफोन अॅप्लीकेशन्सदेखील लाँच करण्यात आले आहेत. फास्टॅग हे रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेंटीफिकेशन या प्रणालीवर आधारित टॅग आहेत. देशभरात हे स्टीकरच्या स्वरूपातील टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. संबंधीत फास्टॅग स्टीकर हे वाहनाच्या विंडशिल्डवर लावलेले असेल. अशा प्रकारच्या वाहनांसाठी देशातील प्रत्येक टोल नाक्यावर स्वतंत्र लेन राखीव ठेवण्यात येणार आहे. यात संबंधीत आरएफआयडी टॅग रीड करणारी यंत्रणा लावण्यात आलेली असेल. सध्या आयसीआयसीआर, अॅक्सीस बँक आणि पेटीएमने या टॅगला कार्यान्वित करण्याची सुविधा दिलेली आहे. मात्र लवकरच अन्य बँका याला लागू करण्याची शक्यता आहे.
यामुळे संबंधीत वाहनचालकाला त्या टोल नाक्यावर थांबून टोल अदा करण्याची आवश्यकता उरणार नाही. तर आरएफआयडी टॅगच्या माध्यमातून त्या युजरच्या अकाऊंटमधून (जे त्याच्या बँक खात्याशी कनेक्ट केलेले असेल!) आपोआप टोलचे पैसे संबंधीत नाक्याच्या खात्यात जमा होतील. अर्थात एकाच वेळी कॅशलेस व्यवहार होत असतांना वाहनचालकाना थांबणे आणि त्यातून त्याच्या प्रवासाला होणार विलंब आणि अर्थातच त्या परिसरातील प्रदूषण, वाहतुकीची कोंडी या सर्व बाबींना आळा बसणार आहे. सध्या तरी कुणीही फास्टॅग आपल्या वाहनाला विकत घेऊन लाऊ शकतो. मात्र भविष्यात प्रत्येक नवीन वाहन विकत घेतांना हा टॅग लावलेला असेल.