लवकरच येणार किफायतशीर 13 इंची मॅकबुक एयर
By शेखर पाटील | Published: March 7, 2018 12:50 PM2018-03-07T12:50:38+5:302018-03-07T12:50:38+5:30
अॅपल कंपनी लवकरच १३ इंची मॅकबुक एयर या लॅपटॉपची किफायतशीर आवृत्ती सादर करणार आहे. २००८ साली मॅकबुक एयर हा लॅपटॉप पहिल्यांदा लाँच करण्यात आला होता.
अॅपल कंपनी लवकरच १३ इंची मॅकबुक एयर या लॅपटॉपची किफायतशीर आवृत्ती सादर करणार आहे. २००८ साली मॅकबुक एयर हा लॅपटॉप पहिल्यांदा लाँच करण्यात आला होता. यानंतर याच्या अनेक आवृत्त्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. तथापि, २०१५ पासून यातल्या १३ इंची मॉडेलची कोणतीही नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आलेली नाही. यातच सद्यस्थितीत बाजारपेठेत असणार्या या प्रकारातील मॅकबुक एयर लॅपटॉपची रेंज ही तशी महागडी आहे. याच्या विविध व्हेरियंटचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ९९९ डॉलर्सपासून सुरू होते. तर भारतात हे अजूनच महागडे असून याचे मूल्य ७७,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे. अलीकडच्या काळात बहुतांश कंपन्यांनी अत्यंत किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम लॅपटॉप सादर केले आहेत. या पार्श्वभूमिवर, अॅपल कंपनी लवकरच थोड्या किफायतशीर मूल्यात मॅकबुक एयरची नवीन आवृत्ती सादर करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.
मॅकबुक एयरच्या नवीन आवृत्तीमध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात येणार असल्याचेही मानले जात आहे. साधारणपणे २०१८च्या मध्यावर ही नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्यात येईल असे मानले जात आहे.