अल्काटेलने आपल्या पॉप १० ४जी या आधी सादर केलेल्या टॅबलेटला आता टु-इन-वन या पर्यायात सादर केले असून याचे मूल्य १२,९९९ रुपये आहे. अल्काटेल कंपनीने गेल्या महिन्यात पॉप १० ४जी हा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रुपये मूल्यात लाँच केला होता. आता याला नवीन स्वरूपात सादर करण्यात आले आहे. याच्या सोबत संलग्न करण्यास सक्षम असणारा की-बोर्डदेखील देण्यात आला आहे. यामुळे हे मॉडेल लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही स्वरूपात वापरता येणार आहे. ब्ल्यु-टूथच्या मदतीने हा कि-बोर्ड टॅबलेटला कनेक्ट करता येतो. तसेच ओटीजी कनेक्टरच्या माध्यमातून माऊसदेखील वापरण्याची सुविधा यात देण्यात आलेली आहे. याचे मूल्य १२,९९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येईल. या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी८१२७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा टॅबलेट ८ व ५ मेगापिक्सल्सच्या अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेर्यांनी सज्ज आहेत. यातील बॅटरी ५८३० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. अल्काटेल पॉप ४ १० या मॉडेलमध्ये वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय डायरेक्ट, हेडफोन जॅक आदी फिचर्स दिलेले आहेत. विशेष म्हणजे यात कुणीही फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट असणारे सीमकार्ड टाकून व्हाईस कॉलींगसह इंटरनेटचा वापर करू शकतो.
अल्काटेलचा टू इन वन टॅबलेट
By शेखर पाटील | Published: March 23, 2018 3:09 PM