नवी दिल्ली : मेसेजिंगसाठी जगप्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअॅपने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत युझर्सची नाराजी दिवसेंदिवस आणखीनच वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. नवीन पॉलिसीच्या विरोधात कोट्यवधी युझर्सनी व्हॉट्सअॅपला रामराम केला आहे. याचा फायदा सिग्नला अॅपला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अनेक दिग्गज मंडळींनंतर आता आनंद महिंद्रा यांनीही व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल अॅपची वाट धरली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे. ''आता मी सिग्नल अॅप डाऊनलोड केले आहे. लवकरच तेथे भेटू'', असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया यावर आल्या असून, काही जणांनी आनंद महिंद्रा यांची फिरकी घेतली आहे, तर काही जणांनी आनंद महिंद्रा यांच्या कृतीला समर्थन दिले आहे.
प्रायव्हसीबाबत चिंता वाटत असेल तर सोशल मीडियाचा वापरच करू नका, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर, अनेक नेटकऱ्यांनी सिग्नल अॅपचे समर्थन करत महिंद्रांनी उचललेले पाऊल योग्य असल्याचे म्हटल आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी तुम्ही डाउनलोड केलेले अॅप आम्हीही निश्चिंतपणे डाउनलोड करू शकतो, असे म्हटले आहे.
दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनीही काही दिवसांपूर्वी ट्विटरवर सिग्नल अॅप वापरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही भारतीयांना सिग्नल अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर जागतिक स्तरावरील अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनीही व्हॉट्सअॅप सोडून अन्य पर्याय स्वीकारले आहेत.