असुस कंपनीने गेल्या मे महिन्यात काँप्युटेक्स-२०१७ या प्रदर्शनीत झेनबुक फ्लिप एस (युएक्स ३७००) हे मॉडेल पहिल्यांदा प्रदर्शीत केले होते. आता हे मॉडेल भारतीय बाजारपेठत उतारण्यात आले आहे. हे टु-इन-वन या प्रकारातील असल्यामुळे ते लॅपटॉपसोबत नोटबुक म्हणूनही वापरता येणार आहे. झेनबुक फ्लिप एसची जाडी फक्त ११.१ मिलीमिटर इतकी तर वजन फक्त १.१ किलोग्रॅम इतके आहे. यामुळे हा जगातील सर्वात स्लीम आणि हलका लॅपटॉप बनला आहे. क्विक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी अतिशय उत्तम दर्जाची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ११ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर ४९ मिनिटांमध्ये ही बॅटरी ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होते हे विशेष. यात दोन युएसबी ३.१ पोर्ट असतील. यासोबत ब्लॅकलिट प्रकारचा कि-बोर्ड, ग्लास टचपॅड, फिंगरप्रिंट सेन्सर, वेबकॅम, कोर्टना या डिजीटल असिस्टंटशी संलग्न करण्याजोगा मायक्रोफोन, हर्मन कार्दोन या कंपनीची दोन स्पीकरयुक्त ध्वनी प्रणाली आदी फिचर्स आहेत. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथची सुविधा असेल.
झेनबुक फ्लिप एस या मॉडेलमध्ये कॉर्निंग गोरीला ग्लासच्या संरक्षक आवरणासह १३.३ इंच आकारमानाचा फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) नॅनोएज या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहेत. हा डिस्प्ले तब्बल १७८ अंशात वाकवून याचा उपयोग करता येणार आहे. यात इंटेलचा आठव्या पिढीतील अतिशय गतीमान असा कोअर आय ७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याला इंटेल युएचडी ग्राफी ६५० या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे. याची रॅम १६ जीबी तर स्टोअरेज ५१२ जीबी इतके असेल. हे मॉडेल विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहे. याचे मूल्य १,३०,९९० रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.