इन्स्टाग्रामवर लवकरच ऑडिओ व व्हिडीओ कॉलिंग

By शेखर पाटील | Published: March 5, 2018 01:26 PM2018-03-05T13:26:17+5:302018-03-05T13:27:05+5:30

इन्स्टाग्राम या अ‍ॅपवर लवकरच व्हाटसअ‍ॅपप्रमाणे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात येणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

Audio and Video Calling On Instagram | इन्स्टाग्रामवर लवकरच ऑडिओ व व्हिडीओ कॉलिंग

इन्स्टाग्रामवर लवकरच ऑडिओ व व्हिडीओ कॉलिंग

Next

इन्स्टाग्राम या अ‍ॅपवर लवकरच व्हाटसअ‍ॅपप्रमाणे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात येणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत. इन्स्टाग्राम या लोकप्रिय अ‍ॅपच्या आगामी आवृत्तीच्या सोर्स कोडचे अध्ययन करून टेकक्रंच या टेक पोर्टलने याबाबत वृत्त दिले आहे. यानुसार इन्स्टाग्रामवर लवकरच ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंंगची सुविधा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण या अ‍ॅपच्या सोर्स कोडमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ या दोन्ही प्रकारातील कॉलिंगसाठी स्वतंत्र आयकॉन देण्यात आले आहेत. याबाबत इन्स्टाग्रामतर्फे कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. तथापी, हे फिचर येत्या काही दिवसांमध्येच या अ‍ॅपच्या जगभरातील युजर्सला मिळणार असल्याचा दावा टेकक्रंचच्या वृत्तात करण्यात आला आहे.

फेसबुकसह या कंपनीची मालकी असणारे फेसबुक मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम यांच्यावर नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. यापैकी इन्स्टाग्रामचाच विचार केला असता, गेल्या काही महिन्यांमध्ये या अ‍ॅपच्या युजर्सला विविधांगी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. या माध्यमातून स्नॅपचॅट या टिन एजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या अ‍ॅपला तगडे आव्हान देण्याचे फेसबुकचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. स्नॅपचॅटच्या स्टोरीज या फिचरची नक्कल इन्स्टाग्रामने आधीच केली असून याला युजर्सचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. यानंतर आता ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सेवा देण्याची तयारी सुरू झाली आहे. हे फिचरदेखील युजर्सला अतिशय उपयुक्त ठरू शकते. इन्स्टाग्रामचे सुमारे ८० कोटी सक्रीय युजर्स आहेत. तर स्टोरीज हे फिचर नियमितपणे वापरणार्‍यांची संख्या ३० कोटींच्या आसपास आहे. यातच आता ऑडिओ व व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेच्या माध्यमातून युजर्सला आकर्षीत करण्याचा इन्स्टाग्रामचा प्रयत्न दिसून येत आहे.

Web Title: Audio and Video Calling On Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.