मुंबई, दि. 19 - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाने 4 जी फिचर फोन मार्केटमध्ये आणण्याची घोषणा केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही प्रत्याक्षात निर्णय या कंपन्याकडून घेण्यात आला नसल्याचे समजते. मात्र, यामध्ये आता बीएसएनएलने उडी घेतली असून आपल्या ग्राहकांसाठी दोन हजार रुपयांचा स्मार्टफोन मार्केटमध्ये येत्या दिवाळीत घेऊन येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ईटीटेलिकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनीकडून नवीन स्मार्टफोन बाजारात उतरण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. हा स्मार्टफोन साधारण महिन्याभरात बाजारात उतरण्यात येईल. अनेक उत्पादन कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले. बीएसएनएलबरोबर भागीदारी करण्यास मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या भारतीय स्मार्टफोन कंपन्या इच्छुक आहेत. बीएसएनएलकडून ग्राहकांना व्हॉईस पॅक आणण्यात येणार आहे, असेही अनुपम श्रीवास्तव म्हणाले. याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये कोणत्या सुविधा असतील याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
एअरटेल आणणार 2500 रुपयांत स्मार्टफोन...रिलायन्स जिओने 4 जी फीचर फोन लॉंच केल्यानंतर एअरटेलने 2500 रुपयांत स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली आहे. एअरटेलचा हा स्मार्टफोन येत्या दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याचबरोबर, या स्मार्टफोनसह अनेक ऑफर्स देण्यात येणार आहेत. यामध्ये डाटा आणि कॉलिंग संदर्भात असणार आहेत.