चीनी कंपनीचा मोठा डाव; 2 कोटी स्मार्टफोनमध्ये व्हायरस टाकले, करोडो कमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 01:33 PM2020-12-06T13:33:22+5:302020-12-06T13:38:58+5:30
Gionee Malware on 20 Million Devices : जिओनी मोबाईलच्या सहाय्यक कंपनीने जाणीवपूर्वक तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त डिव्हाईसमध्ये ट्रोजन हॉर्स व्हायरस टाकल्याची माहिती आता समोर आली आहे.
चीनमधील एका कोर्टाने चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी जिओनीशी (Gionee) संबंधित एक मोठा निर्णय दिला आहे. निकालानुसार, जिओनी मोबाईलच्या सहाय्यक कंपनीने जाणीवपूर्वक तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त डिव्हाईसमध्ये ट्रोजन हॉर्स व्हायरस टाकल्याची माहिती आता समोर आली आहे. युजर्सच्या परवानगी शिवाय त्यांना अनावश्यक जाहिराती या व्हायरसच्या माध्यमातून दाखवण्यात येत असे. याच्या मार्फत कंपनीने कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
डिव्हाईसमध्ये असा टाकला व्हायरस
कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, डिसेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत एका अॅपच्या माध्यमातून तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त जियोनी फोन्स हे जाणीवपूर्वक ट्रोजन हॉर्स मॅलवेअरने संक्रमित करण्यात आले. एका टूलच्या मदतीने हे अॅप बक्कळ कमाई करत होतं. हा व्हायरस 'स्टोरी लॉक स्क्रीन' अॅपच्या अपडेटमार्फत या फोनमध्ये टाकण्यात आला. जिओनीची सहाय्यक कंपनी शेन्झेन झिपू (Shenzhen Zhipu) टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने हे काम केलं होतं.
अलर्ट! WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर, असा मेसेज आल्यास वेळीच व्हा सावधhttps://t.co/ZLTZGjz1kz#WhatsApp#Technology
— Lokmat (@MiLOKMAT) November 23, 2020
रिपोर्टनुसार, डिसेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत कंपनीने ट्रोजन हॉर्सद्वारे 42 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 31 कोटी रुपये कमावले आहेत. याच काळात कंपनीने केवळ 13 डॉलर्स (सुमारे 9.59 कोटी रुपये) खर्च केले. अवैधरीत्या डिव्हाईसेस नियंत्रित केल्याप्रकरणी चार अधिकारी दोषी आढळले आहेत. प्रत्येकाला दोन लाख युआन (सुमारे 22 लाख रुपये) दंड आणि तीन वर्षांची जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.