नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 150 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 5000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी फेसबुक, गुगल आणि टिकटॉकनंतर आता ट्विटरनेही मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी मायक्रो ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरच्या सीईओनी मोठी घोषणा केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी 1 अब्ज डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. डोर्सी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. 'कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी 1 अब्ज डॉलरची मदत करत आहोत. ही मदत स्टार्ट स्मॉलच्या माध्यमातून केली जात आहे. ज्यावेळी आपण या महामारी रोगाच्या विरोधातील लढाई जिंकू, त्यानंतर या फंडचा उपयोग बालकांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी करण्यात येईल' असं म्हटलं आहे.
जॅक यांनी आपल्या ट्विटमध्ये एक लिंकही शेअर केली असून त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. त्यांनी दिलेला फंड कसा खर्च करण्यात येईल हे सांगितले असून जगातील कोणताही व्यक्ती त्याचं ट्रेकिंग करू शकेल असं म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. टिकटॉकने 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. भारताला टिकटॉकडून 100 कोटींचे मेडिकल इक्विपमेंट देण्यात आले आहेत. यामध्ये 4,00,000 प्रोटेक्टिव्ह सूट आणि 2,00,000 मास्कचा समावेश आहे. टिकटॉकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.
लघू तसेच मध्यम उद्योग, आरोग्य संघटना तसेच प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी गुगलने ही मदत जाहीर केली आहे. सुंदर पिचाई यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. 'गुगल अॅड क्रेडिटच्या रुपात 340 मिलियन डॉलर दिले जाईल. हे क्रेडिट मागील एक वर्षापासून सक्रिय खाते किंवा व्यवसाय असलेल्या लोकांना दिले जाईल' असं ट्विट पिचाई यांनी केलं आहे. सुंदर पिचाई यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि 100 पेक्षा अधिक शासकीय यंत्रणांसाठी सुमारे 1800 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसेच 150 कोटी रुपये सामुदायिक वित्तीय संस्था तसेच स्वयंसेवी संस्था, 2500 कोटी लघू तसेच मध्यम उद्योगांना उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर
Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्
CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५१४९वर पोहोचली, १४९ जणांचा मृत्यू
CoronaVirus: 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार; १५ पासून देशात काय काय बदलणार?