Twitter ला टक्कर देणार डोनाल्ड ट्रम्प यांचे Truth Social; जाणून घ्या डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 04:54 PM2022-02-21T16:54:23+5:302022-02-21T16:54:45+5:30
Truth Social app launches : Truth Social हा ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचा पहिला प्रोजेक्ट आहे. या नवीन कंपनीची योजना सबस्क्रिप्शन बेस्ड व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिस लाँच करण्याची होती.
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल (Truth Social) हे नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच केले आहे, जे आज रात्रीपर्यंत रोलआउट केले जाऊ शकते. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मार्चपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर प्रोफाइलवर गेल्या एक वर्षापासून बंदी घालण्यात आली आहे.
ट्विटरसोबतच 6 जानेवारी 2021 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक आणि यूट्यूबवरही बंदी घालण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर बंदी घालण्यापूर्वी त्यांचे 89 मिलियन फॉलोअर्स होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडिया अॅप App Store वर लिस्ट करण्यात आले आहे. अॅप स्टोअरच्या स्क्रिनशॉटनुसार Truth Social अगदी ट्विटरसारखे दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दुसरा प्रयत्न आहे, त्याआधी मे महिन्यात ब्लॉग सुरू झाला होता, जो महिनाभरात डिलिट करण्यात आला होता. Truth Social अॅप ट्रम्प मीडियाने (Trump Media) विकसित केले आहे.
Truth Social हा ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचा पहिला प्रोजेक्ट आहे. या नवीन कंपनीची योजना सबस्क्रिप्शन बेस्ड व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिस लाँच करण्याची होती. या Truth Social अॅपमध्ये पोस्टच्या खाली रिप्लाय, शेअर आणि लाईक बटण दिले जाईल. युजर्स आपल्या आवडत्या व्यक्तीला फॉलो करू शकतील. तसेच, युजर्स ट्रेंडिंग विषय निवडू शकतील. हा प्लॅटफॉर्म ओपन आणि मोफत असणार आहे. या अॅपचे बीटा व्हर्जन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सादर करण्यात आले होते.
21 फेब्रुवारी रोजी अॅप लाँच करण्यात आले आहे. हे सध्या भारतात अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. दरम्यान, Truth Social अॅपच्या पहिल्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, "तयार व्हा, तुम्ही तुमच्या आवडत्या राष्ट्रपतींना लवकरच भेटू शकाल". दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प जूनियर यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही वेळ काही सत्य म्हणजेच Truth साठी आहे.