फनी व्हिडीओसाठी फेसबुकने लाँच केलं एक खास अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 01:24 PM2018-11-12T13:24:59+5:302018-11-12T14:14:17+5:30
फेसबुकने युजर्सचे व्हिडीओ आणखी मजेशीर आणि फनी करण्यासाठी एक व्हिडीओ अॅप लाँच केलं आहे. या नव्या व्हिडीओ अॅपमध्ये फेसबुकने अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा समावेश केला आहे.
नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स आणत असतं. यावेळी ही फेसबुकने युजर्सचे व्हिडीओ आणखी मजेशीर आणि फनी करण्यासाठी एक व्हिडीओ अॅप लाँच केलं आहे. या नव्या व्हिडीओ अॅपमध्ये फेसबुकने अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा समावेश केला आहे. यामुळे युजर्स अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हवे तसे मजेदार व्हिडीओ तयार करु शकतात.
फेसबुकने लासो (Lasso) नावाचा एक खास अॅप लाँच केला आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स एक छोटा मजेशीर व्हिडीओ झटपट तयार करून सोशल मीडियावर तो शेअर करू शकतात. युजर्स आपल्या व्हिडीओमध्ये एडिटींग टूलच्या मदतीने टेक्स्ट आणि म्युझिकचाही वापर करू शकतात. हेच या अॅपचं वैशिष्ट्य आहे. हे अॅप अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीवर काम करणार आहे.
फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर एंडी हुआन यांनी फेसबुक नवं लासो हे व्हिडीओ अॅप अमेरिकेमध्ये असल्याचं ट्विट केलं आहे. अॅपच्या माध्यमातून तयार करण्यात येणारे सर्व व्हिडीओ शेअर केल्यानंतर सर्वांना दिसेल. लासो अॅपचा वापर करण्यासाठी सर्वात आधी फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लॉग इन करणं गरजेचं आहे. तसेच तयार करण्यात आलेले व्हिडीओ फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करता येणार आहे. सर्वत्र हे अॅप कधी उपलब्ध होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.