फेसबुक ही सोशल नेटवर्कींग साईट आपल्या युजर्सच्या सर्व माहितीसोबत त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड तसेच एसएमएस व एमएमएसची माहितीसुध्दा गुप्तपणे जमा करत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. केंब्रिज अॅनालिटीकाच्या माध्यमातून डाटा लीक प्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडलेल्या फेसबुकची अजून एक संशयास्पद कृती जगासमोर आली आहे. एआरएस टेक्नीका या टेक पोर्टलने हा गौप्यस्फोट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. केंब्रिज अॅनालिटीकाच्या प्रकरणात फेसबुकने थर्ड पार्टी अॅप्लीकेशन्स माहिती जमा करत असल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, आता खुद्द फेसबुकच युजर्सचा कॉल तसेच एसएमएस आणि एमएमएसचा डाटा जमा करत असल्याचे उघडकीस आले आहे. डायलन मॅके या न्यूझिलंडमधील युजरने ही बाब पहिल्यांदा जगासमोर आणली असून यावर एआरएस टेक्नीकाने वृत्तांत (https://arstechnica.com/information-technology/2018/03/facebook-scraped-call-text-message-data-for-years-from-android-phones) प्रकाशित केला आहे. यानुसार डायलन मॅके याने गेल्या आठवड्यात फेसबुकने अधिकृतरित्या दिलेल्या माध्यमातून आपला या साईटवरील सर्व डाटा डाऊनलोड केला. यात त्याला आपल्या प्रोफाईलवरील सर्व माहितीसोबत त्याने दोन वर्षात केलेल्या कॉल्सचे पूर्ण विवरण (मेटाडाटा) तसेच एसएमएस आणि एमएमएसची सर्व माहितीदेखील आढळून आली. यातील कॉल्सचे तर सविस्तर विवरण देण्यात आले होते. यात मॅके याने कुणाला कोणत्या वेळी कॉल केला; त्यांचे संभाषण किती वेळ झाले; त्याला कुणाचा कॉल आणि केव्हा आला; तसेच तो किती वेळ बोलला याचे सविस्तर विवरण देण्यात आल्याची धक्कादायक बाब आढळून आली. डायलन मॅके याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (https://twitter.com/dylanmckaynz) या सर्व प्रकाराचा गौप्यस्फोट केला. विशेष म्हणजे त्याने फेसबुकवरून डाऊनलोड केलेला आपला संपूर्ण डाटा झिप फाईलच्या माध्यमातून कुणालाही डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिला.
डायलन मॅके याच्या गौप्यस्फोटावरून अध्ययन केले असता फेसबुक कंपनी अँड्रॉइड युजरच्या कॉल आणि एसएमएस रेकॉर्डची माहिती जमा करत असल्याचे दिसून आले. तर आयओएस प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन अर्थात आयफोनवरील माहिती मात्र सुरक्षित असल्याचे यातून सिध्द झाले. अँड्रॉइड प्रणालीचा वापर करतांना युजर्सच्या ज्या परमीशन्स घेण्यात येतात, त्यात कॉल आणि एसएमएस रेकॉर्डचाही समावेश असतो. नेमक्या याच तांत्रिक आडवाटेचा आश्रय घेऊन फेसबुकचे अँड्रॉइड अॅप हे संबंधीत युजर्सच्या फोन रेकॉर्डला हुशारीने जमा करत असल्याचे एसआरएस टेक्नीका पोर्टलला आढळून आले. फेसबुकच्या मुख्य अॅपसह फेसबुक लाईट आणि फेसबुक मॅसेंजरचा वापर करणार्या युजर्सच्या कॉल डिटेल्सची माहिती या माध्यमातून जमा करण्यात येत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
दरम्यान, एआरएस टेक्नीकाच्या या वृत्तानंतर जगभरात खळबळ उडाली असून फेसबुक प्रशासनाने यावर एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून (https://newsroom.fb.com/news/2018/03/fact-check-your-call-and-sms-history ) सफाई दिली आहे. यात फेसबुकवर कॉल डिटेल्सची माहिती जमा करण्यात येत असल्याच्या दाव्याची पुष्टी करण्यात आली आहे. तथापि, ही माहिती द्यावी की नाही याचा पर्याय युजरला देण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. फेसबुक मॅसेंजर आणि फेसबुक लाईट अॅपला इन्स्टॉल करण्यासाठी कॉल लॉगचा अॅक्सेस मागितला जातो. याला युजरने नकार दिल्यास त्याच्या कॉल डिटेल्सची माहिती जमा केली जात नसल्याचा दावा फेसबुकने केला आहे. विशेष बाब म्हणजे जे युजर्स याला परवानगी देतात त्यांच्या कॉल्सची माहिती ही अत्यंत सुरक्षित अशा सर्व्हरवर ठेवली जात असून त्याचा व्यावसायिक उपयोग करत नसल्याची सफाई फेसबुकने दिली आहे. तसेच याचा कोणताही व्यावसायिक उपयोग केला जात नसल्याचेही या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, आधी कॉल लॉगच्या माहितीचा अॅक्सेस दिलेले युजर आपल्या सेटींगमध्ये जाऊन (https://www.facebook.com/help/fblite/355489824655936) हा पर्याय ऑफदेखील करू शकतात असे फेसबुकतर्फे सांगण्यात आले आहे. तथापि, यातून फेसबुकबाबत पुन्हा एकदा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
डायलन मॅके याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फेसबुकने जमा केलेला कॉल्सची माहिती खालील प्रकारे सर्वांना उपलब्ध करून दिली आहे.