मुंबई: गार्मीन कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपला विवोफिट ४ हा अॅक्टीव्हिटी (फिटनेस) ट्रॅकर सादर केला आहे. वेअरेबल्स अर्थात परिधान करण्यायोग्य उपकरणांच्या निर्मितीत गार्मीन ही जगातील आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीने आधीच स्मार्टवॉच, स्मार्टबँड, फिटनेस ट्रॅकर्स आदी विविध प्रकारांमध्ये उत्पादने सादर केले आहेत. यात विवोफिट या मालिकेतील अॅक्टीव्हिटी ट्रॅकर लोकप्रिय झाले आहेत. याच मालिकेत विवोफिट ४ हे मॉडेल आता सादर करण्यात आले आहे. हा फिटनेस बँड ४,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. ब्लॅक, व्हाईट आणि ब्लॅक सेपल या तीन रंगांमध्ये आणि रेग्युलर तसेच लार्ज या दोन प्रकारांमध्ये हा फिटनेस ट्रॅकर उपलब्ध करण्यात आला आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल एक वर्षापर्यंत चालत असल्याचे गार्मीन कंपनीने नमूद केले आहे. ही या मॉडेलची खासियतदेखील मानली जात आहे. यामुळे या फिटनेस बँडला वारंवार चार्ज करण्याची आवश्यकता उरणार नाही. मात्र वर्षानंतर बॅटरी बदलावी लागणार आहे. वॉटरप्रूफ असल्यामुळे याला पाण्यातही वापरता येणार आहे.
गार्मीनच्या विवोफिट ४ या मॉडेलमध्ये स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर या दोन्ही प्रकारातील विविध फिचर्स देण्यात आले आहेत. अॅक्टीव्हिटी ट्रॅकरमधून याच्या माध्यमातून चाललेले, धावलेले वा सायकलींगच्या माध्यमातून कापलेले अंतर, त्यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, निद्रेचे मापन आदी विविध फंक्शन्स देण्यात आले आहेत. अर्थात कुणीही चालण्यासह सायकलींग, जॉगींग, पोहणे आदींसाठी याचा वापर करू शकतो. मात्र यात हृदयांच्या ठोक्यांचे मापन करण्याची सुविधा नाहीय. यात मुव्हआयक्यू या स्वतंत्र प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने विविध अॅक्टीव्हिटींमधील फरक हा अचूकपणे समजू शकतो. याशिवाय स्मार्टवॉच म्हणूनही याचा वापर करता येईल. यात अँड्रॉइड व आयओएस अॅपच्या माध्यमातून व ब्ल्यु-टुथच्या मदतीने हा फिटनेस ट्रॅकर स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे. यानंतर स्मार्टफोनवर कॉल करणे/रिसीव्ह करणे, एसएमएस पाठविणे/वाचणे आदी फंक्शन्स वापरता येतील. स्मार्टफोनवरील विविध नोटिफिकेशन्सही यावर समजू शकतील.