गुगल व अॅपलचा दणका : साराह अॅपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
By शेखर पाटील | Published: March 5, 2018 06:30 PM2018-03-05T18:30:30+5:302018-03-05T18:30:30+5:30
अगदी काही महिन्यांमध्ये साराह अॅपला तब्बल ३० कोटींपेक्षा जास्त युजर्स लाभले होते.
मुंबई: गैरप्रकाराच्या तक्रारींची दखल घेत गुगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरून साराहच्या लिंक हटविण्यात आल्याने साराह अॅपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेले साराह अॅप आता काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात साराह या नावाचे अॅप अचानक तुफान लोकप्रिय झाले होते. हे ऑनेस्टी अॅप या प्रकारातील स्मार्टफोन अॅप्लिकेशन होते. खरं तर आधीच या प्रकारातील अनेक अॅप्स उपलब्ध असतानाही साराहला मिळालेली लोकप्रियता ही बर्याच प्रमाणात आश्चर्यकारक मानली गेली होती. अर्थात यामधील सुविधादेखील तशाच होत्या. एक तर कुणीही व्यक्ती अज्ञात राहून समोरच्या कोणत्याही युजरला हवा तो संदेश पाठवू शकत होती. तसेच याच्या लिंक फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटवर शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली होती. साराह अॅप लोकप्रियतेच्या पायर्या तुफान वेगाने चढत असतांना सोशल मीडियातही याबाबत मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू झाले होते. अगदी काही महिन्यांमध्ये साराह अॅपला तब्बल ३० कोटींपेक्षा जास्त युजर्स लाभले होते. मात्र याचसोबत याच्या गैरवापराबाबत तक्रारीदेखील सुरू झाल्या होत्या. अशाच एका तक्रारीमुळे साराह अॅपचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियातील कॅटरीना कॉलीन्स या महिलेने आपल्या १३ वर्षाच्या मुलीला साराह अॅपच्या माध्यमातून आलेले संदेश वाचले तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. तिच्या कन्येला अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह भाषांमध्ये अनामिकांचे संदेश मिळाले होते. यामुळे कॅटरीनाने साराह अॅपवर बंदी घालण्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल केली. याला जगभरातील तब्बल ४.७ लाख युजर्सनी पाठिंबा दर्शविला. या जनक्षोभाची दखल घेत गुगलने आपले गुगल प्ले स्टोअर तर अॅपलने अॅप स्टोअरवरून साराह अॅप हटविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गुगल सर्चमधूनही याची माहिती काढण्यात आली आहे. म्हणजेच अँड्रॉइड व आयओएस युजर्स हे अॅप नव्याने डाऊनलोड करू शकत नाहीत. आधी ज्यांनी हे अॅप इन्स्टॉल केलेय ते याचा उपयोग करू शकतात. तसेच साराहच्या अधिकृत संकेतस्थळावरही याला उपलब्ध करण्यात आले आहे. तथापि, जगातील बहुतांश अॅप हे प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरूनच वापरले जात असल्यामुळे आता साराह अॅपचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या अॅपला विकसित करणारा सौदी अरेबियातील डेव्हलपर जैनुलबदीन तौफीक याने मात्र साराह अॅप हे वापरण्यास सुरक्षित असल्याचे पालपूद लावले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार साराह हे अॅप अल्पवयीनांनी वापरू नये असे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. यात सुरक्षिततेची पूरेपूर काळजी घेण्यात आली आहे. तर आगामी काळात आर्टीफिशियल इंटिलिजन्स आणि मशिन लर्निंगच्या माध्यमातून याच्या सुरक्षेला अजून मजबूत करण्यात येणार असल्याचे तौफीक म्हणाला. साराह अॅपला हटविण्याचा गुगल व अॅपलचा निर्णय दुर्दैवी असून याबाबत आपण संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून याला पुन्हा उपलब्ध करण्याची मागणी करणार असल्याची माहितीसुध्दा जैनुलबदीन तौफीकने दिली आहे.