सॅन फ्रॅन्सिस्को , दि. 21 - गुगलने तायवानची कंपनी HTC कडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे. गुगलने तब्बल 1.1 अब्ज डॉलरमध्ये हा करार केला. गुगलने पिक्सल फोनच्या निर्मितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. गुगल आणि एचटीसीच्या या कराराचा परिणाम थेट स्मार्टफोन इंडस्ट्रीवर होणार असल्याचं बोललं जात आहे. हा परिणाम कालांतराने पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एचटीसीच्या टीमसोबत काम करून सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न असणार आहे. एका रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार अॅपल प्रमाणे गुगल देखील स्वतःचं प्रोसेसर बनवत आहे. सध्या गुगल आपल्या पिक्सल स्मार्टफोनसाठी दुस-या कंपन्यांसोबत भागीदारी करतं आणि फोनचं हार्डवेअर इतर कंपन्या बनवतात. गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर असतं. गुगल आणि एचटीसी यांनी यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. गुगलचा पहिला नेक्सस डिव्हाइस देखील एचटीसीनेच बनवला होता. पण या करारामुळे एचटीसीचा मोबाइल फोनचा बिझनेस ब्लॅकबेरीप्रमाणे बंद होणार नाही. यापुढेही एचटीसी स्वतःच्या ब्रॅंडसाठी काम करेल. एचटीसीचे सीईओ शीर वांग यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही यापुढे एचटीसी स्मार्टफोन्स आणि वाइव व्हर्चुअल रिअलिटी बिझनेसमध्ये नाविन्यपणा आणण्यावर काम करू असं ते म्हणाले. मोबाइल बिझनेसमध्ये येण्याची तयारी गुगलने यापुर्वीही केली होती. यासाठी कंपनीने 2011 मध्ये मोटोरोला कंपनी जवळपास 12.5 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती आणि काही स्मार्टफोनही लॉन्च केले होते. मात्र, कालांतराने मोटोरोलाला लिनोव्होने खरेदी केलं.
गुगलने 1.1 अब्ज डॉलरला खरेदी केला HTC स्मार्टफोनचा बिझनेस, देणार सॅमसंग आणि अॅपलला टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 6:43 PM