गुगल होम मॅक्स : प्रिमीयम स्मार्ट स्पीकर
By शेखर पाटील | Published: October 5, 2017 07:32 PM2017-10-05T19:32:46+5:302017-10-05T19:33:17+5:30
गुगल कंपनीने आपल्या मेगा लाँच इव्हेंटमध्ये गुगल होम या स्मार्ट स्पीकरची प्रिमियम आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे.
गुगल पिक्सल २ आणि पिक्सल एक्सएल २ या दोन स्मार्टफोनसोबत अन्य काही उपकरणेदेखील लाँच करणार असल्याचे मानले जात होते. या अनुषंगाने गुगल होम या स्मार्ट स्पीकरची मिनी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. खरं तर गुगल होम मिनी हे मॉडेल आधीच अनेक लीक्समधून समोर आले होते. मात्र या कार्यक्रमात गुगलने गुगल होम मॅक्स या दुसरा स्मार्ट स्पीकर सादर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हे मॉडेल म्हणजे गुगल होम या स्मार्ट स्पीकरची प्रिमीयम आवृत्ती आहे.
गुगल होम मॅक्स या स्मार्ट स्पीकरमध्ये ४.५ इंच आकारमानाचे दोन वुफर्स देण्यात आले आहेत. यात अत्यंत संवेदनशील असे सहा मायक्रोफोनही असतील. याच्या मदतीने अगदी गदारोळ असतांनाही व्हाईस कमांडचा उपयोग करता येत असल्याचा गुगलने दावा केला आहे. यात स्मार्ट क्लाऊड नावाची मशीन लर्नींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने घरातील कोणत्याही कोपर्यात हा स्मार्ट स्पीकर असला तरी तो आपल्या भौगोलिक ठिकाणाशी स्वयंचलीत पध्दतीने अॅडजस्ट होतो. तसेच घरातील वातावरणाचे अचूक आकलन करून याचा आवाज आपोआप कमी-जास्त होतो. अर्थात घरात कुणी मोठ्याने बोलत असल्यास या स्पीकरचा आवाज स्वयंचलीत पध्दतीने मोठा होतो. तर घरात शांतता असल्यास आवाज कमी होतो. याला आडवा आणि उभा या दोन्ही पध्दतीत वापरणे शक्य आहे.
गुगल होम मॅक्स या मॉडेलला गुगल क्रोमकास्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. यातही गुगल असिस्टंटवर आधारित व्हाईस कमांडचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे कुणीही ओके गुगल म्हणून याला विविध आज्ञावली देऊ शकतो. याच्या मदतीने कुणीही घरातील स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करून याच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. यात ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय यात ऑडिओ जॅकदेखील देण्यात आले आहे. यामुळे याला अन्य उपकरणे जोडणे शक्य आहे. गुगल होम मॅक्सचे मूल्य ३९९ डॉलर्स असून ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल डिसेंबर महिन्यात मिळणार आहे. या स्मार्ट स्पीकर खरेदी करणार्याला गुगलने एक वर्षापर्यंत युट्युब म्युझिकची प्रिमीयम मेंबरशीप मोफत देण्याची घोषणा केली आहे.
पहा: गुगल होम मॅक्सची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.