गुगल लेन्सचा विस्तार करण्यात आला असून आता कोणत्याही अँड्रॉइड प्रणालीवर चालणार्या स्मार्टफोनमध्ये याची सुविधा देण्यात आली आहे.
गुगल कंपनीने आपल्या गत आय/ओ परिषदेत गुगल लेन्स हे व्हिज्युअल सर्च इंजिन पहिल्यांदा प्रदर्शीत केले होते. नंतर हे फिचर गुगल कंपनीच्या पिक्सेल-२ आणि पिक्सेल-२ एक्सएल या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये अॅपच्या स्वरूपात देण्यात आले होते. याला गुगल फोटोज आणि गुगल असिस्टंटशी संलग्नदेखील करण्यात आले होते. आता मात्र अँड्रॉइड प्रणालीवर चालणार्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये याचा वापर करता येणार आहे. अर्थात यासाठी संबंधीत युजरने आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल फोटोज हे अॅप इन्स्टॉल केलेले असावे. वर नमूद केल्यानुसार गुगल लेन्स हे व्हिज्युअल सर्च इंजिन असून यात कोणत्याही प्रतिमेतील वास्तू अथवा अन्य बाबींना कृत्रीम बुध्दीमत्तेच्या उपयोगाने ओळखता येते. यानंतर संबंधीत बाबींचे आकलन करून युजरला विविध रेकमेंडेशन्स करण्यात येतात. उदाहरणार्थ एखाद्या रेल्वे स्थानकाचे नाव दर्शविणारी प्रतिमा गुगल लेन्सने स्कॅन करता ही प्रणाली संबंधीत रेल्वे स्थानकाचा नकाशा, यावरून धावणार्या गाड्यांचे वेळापत्रक आदींची माहिती त्या युजरला तात्काळ देऊ शकते. तसेच यात बिझनेस कार्ड स्कॅन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने संबंधीत कार्डधारकाची विविध माहिती कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करण्याची सुविधादेखील दिलेली आहे. अँड्रॉइड युजर्सला गुगल लेन्स वापरता येणार आहे. यासाठी गुगल फोटोजचे अपडेट सादर करण्यात आले आहे. तर आयओएस प्रणालीसाठी ही सुविधा येत्या काही दिवसांमध्ये सादर करण्यात येणार असल्याचे गुगलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.