एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास करताना हमखास गुगल मॅप्सचा वापर केला जातो. गुगल मॅप्सच्या मदतीने अनेकदा रस्ता शोधणं अथवा पत्ता सापडणं सहज शक्य होतं. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी वेळेत इच्छित स्थळी पोहचण्यास मदत होते. मात्र गुगल मॅपचा वापर करणं एक तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. गुगल मॅपच्या चुकीमुळे तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियाच्या सायबेरियामध्ये राहणाऱ्या तरुणाला गुगलने चुकीचा रस्ता दाखवला आणि यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 18 वर्षीय तरूण आपल्या एका मित्रासोबत बाहेर गेला होता. त्याने गुगल मॅपची रस्ता शोधण्यासाठी मदत घेतली. त्यावळी गुगलने त्याला चुकीचा रस्ता दाखवला. त्यामुळे तो चुकीच्या ठिकाणी पोहोचला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. सर्गे उस्तीनोव आणि वाल्दील्साव इस्तोमिन हे दोघे सायबेरियातील पोर्ट ऑफ मॅगेडन या भागात जात होते. हा भाग थंड प्रदेश आहे. त्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली.
गुगल मॅपच्या एका चुकीमुळे हे दोघेही चुकून रोड ऑफ बोन्स या ठिकाणी पोहचले. हा भाग रात्रीच्या वेळेस हवामानामुळे धोकादायक समजला जातो. या ठिकाणी रात्री तापमानात मोठी घट होते. गुगल मॅपने शॉर्टकट दाखवण्याच्या प्रयत्नात दोघांना या धोकादायक मार्गावर पाठवले. हा मार्ग अवघडही आणि धोकादायक होता. हा रस्ता पूर्णपणे बर्फाच्छादीत होता. तापमानात मोठी घट झाल्यामुळे कारच्या रेडियेटरनेदेखील काम करणे बंद केले. यामध्ये थंडीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
तरुणांना येथील वातावरणाबद्दल माहिती नव्हती. तसेच दुसऱ्या तरुणाची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे. ज्या मार्गावर सर्गे याचा मृत्यू झाला, त्या मार्गाला 'मृत्यूचा मार्ग' म्हटलं जातं. या रस्त्याच्या निर्मिती सोव्हिएत युनियनच्या काळात स्टॅलिनने केली होती. या रस्त्याच्या बांधणीसाठी कैद्यांचा वापर केला असल्याचे म्हटले जाते. रस्तेबांधणीच्या वेळीही अनेकांचा मृत्यू झाला होता. 1970 नंतर या रस्त्याचा वापर करणे बंद केला असल्याचं म्हटलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.