गुगलला आपला लोकप्रिय इंटरनेट ब्राऊझर गुगल क्रोम विकावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून गुगलवर याबाबतचा दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. एका न्यायालयीन प्रकरणात गुगल क्रोमचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून निकाल येण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने बाजारावर ताबा मिळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सरकारला गुगल क्रोमची एकाधिकारशाही संपवायची आहे. यामुळे गुगलवर संक्रांत कोसळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील एका न्यायालयाने गुगलला विश्वासदर्शक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात दोषी ठरविले होते. गुगलने सर्च आणि जाहिरातींच्या बाजारात एकाधिकारशाहीचा चुकीच्या पद्धतीने फायदा उठविला असा ठपका ठेवण्यात आला होता. क्रोमद्वारे गुगलने एकाधिकारशाही कायम ठेवण्यासाठी काम केले, असा त्याचा अर्थ काढण्यात आला होता.
Google चीच ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असलेले अँड्रॉईडधारक मोठ्या प्रमाणावर क्रोम वापरतात, त्यांचा डेटा वापरून गुगल जाहिरातींद्वारे या युजरना टार्गेट करते. यासाठी खास अल्गोरिदम गुगल वापरते. गुगल क्रोमद्वारे सर्चचा वापर करणाऱ्यांची संख्या ही एकूण युजरच्या ६५ टक्के एवढी मोठी आहे. Apple Safari कडे 21% मार्केट शेअर आहे. तर अन्य ब्राऊजर्स खूपच कमी प्रमाणावर वापरले जात आहेत.