'Google Pay' ला टक्कर देणार 'Truecaller Pay'!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:07 PM2018-12-03T16:07:28+5:302018-12-04T16:56:30+5:30
मार्च 2019 पर्यंत Truecaller Payचे 25 कोटी युजर्स असतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : भारतात ट्रू कॉलर युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युजर्ससाठी कंपनीने पेमेंट प्लॅटफॉर्म Truecaller Pay सुद्धा उपलब्ध केला आहे. ट्रू कॉलर अॅपच्या मुख्य ऑप्शनमध्ये Truecaller Pay चा ऑप्शन देण्यात आला आहे. भारतातील लोकांकडून सध्या डिजिटल पेमेंटचा वापर जास्त होत आहे. त्यामुळे कंपनीकडून आपल्या पेमेंट सर्व्हिसवर जास्त भर देण्यात येत आहे.
मार्च 2019 पर्यंत Truecaller Payचे 25 कोटी युजर्स असतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, दररोज जवळपास एक लाख लोकांकडून आपले बँक खाते लिंक करण्यात येत आहे. यामध्ये 50 टक्के यूपीआयचे नवीन युजर्स आहेत. Truecaller Pay चे उपाध्यक्ष सोनी जॉय यांनी सांगितले की, जेव्हापासून आम्ही Truecaller Pay लाँच केले आहे. तेव्हापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी पेमेंट प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच, या अॅपमध्ये जास्त फीचर देण्यासाठी काम करण्यात येत आहे.
दरम्यान, स्वीडनमधील ट्रू सॉफ्टवेअर कंपनीचा ट्रू कॉलर हा एक भाग आहे. कंपनीने 2009 मध्ये ट्रू कॉलर लाँच केले होते. ट्रू कॉलर अॅपचा वापर जगभरात फोन नंबरची माहिती मिळविण्यासाठी केला जातो. मात्र, आता कंपनीने भारतात या अॅपच्या माध्यमातून पेमेंट सर्व्हिस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनीच्या दाव्यानुसार, येत्या काही दिवसांत ट्रू कॉलर अॅप दुसऱ्या पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या अॅप्सना टक्कर देणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या डिजिटल मार्केटमध्ये गुगल पे आणि पेटीएम यासारखे अॅप्स जास्त लोकप्रिय आहेत. गुगलने गेल्या सप्टेंबर महिन्यात जाहीर केले होते की, गुगल पे अॅपचे महिन्याला 2.5 कोटी युजर्स आहेत.