गुगलने अतिशय दर्जेदार फिचर्सने सज्ज असणारा पिक्सलबुक हा लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यासोबत स्टायलस पेनसुध्दा वापरता येणार आहे. गुगल पिक्सलबुक हे एका अर्थाने हाय एंड क्रोमबुक आहे. या लॅपटॉपमध्ये गुगल असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे. अॅपलने आधीच आपल्या मॅकबुक प्रो या मॉडेलमध्ये सिरी हा डिजीटल असिस्टंट दिला आहे. तर काही लॅपटॉपमध्ये कोर्टना हा असिस्टंटही याच स्वरूपात देण्यात आला आहे. याचा विचार करता पिक्सलबुकमध्ये गुगल असिस्टंटची सुविधा तशी अपेक्षितच मानली जात होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
विशेष बाब म्हणजे गुगल असिस्टंटसाठी या मॉडेलमध्ये स्वतंत्र की देण्यात आली आहे. याशिवाय कुणीही ओके गुगल म्हणून ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्स कार्यान्वित करू शकतो. यात १२.३ इंच आकारमानाचा आणि २४०० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा एलसीडी डिस्प्ले असून तो ३६० अंशात फिरणारा व टचस्क्रीन या प्रकारातील असेल. याच्या विविध व्हेरियंटमध्ये १६ जीबीपर्यंत रॅम तर ५१२ जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोअरेज असेल. यात इंटेलचा सातव्या पिढीतला कोअर आय-५ हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ब्लॅकलिट या प्रकारातील कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. तर यातील ४१ वॅट क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये एचडी क्षमतेचा कॅमेरादेखील देण्यात आला आहे.
गुगल पिक्सलबुक हा लॅपटॉप गुगल कंपनीच्या क्रोम या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा असला तरी यात अँड्रॉइडचे अॅप्स वापरता येतील हे विशेष. गेल्या अनेक दिवसांपासून गुगल कंपनी आपल्या क्रोम आणि अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीम्सला एकत्र करणार असल्याची चर्चा होती. पिक्सलबुकच्या माध्यमातून गुगलने याकडे एक पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. तर पिक्सलबुक सोबत ९९ डॉलर्स मूल्य असणारा पिक्सलबुक पेनदेखील सादर करण्यात आला आहे. हा अतिशय दर्जेदार असा स्टायलस पेन आहे. याच्या मदतीने रेखाटन करण्यासह नोटस्देखील घेता येणार आहेत. गुगल पिक्सलबुक हे मॉडेल कन्व्हर्टीबल या प्रकारातील आहे. अर्थात हे मॉडेल लॅपटॉपसोबत टॅबलेट म्हणूनदेखील वापरणे शक्य आहे. एकंदरीत ते टॅबलेट, स्टँट, टेंट आणि लॅपटॉप या चार प्रकारात वापरता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
गुगल पिक्सलबुकच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ९९९ ते १६९९ डॉलर्सच्या दरम्यान असेल. ३१ ऑक्टोबरपासून अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आदी देशांमध्ये याची विक्री सुरू होणार आहे. या माध्यमातून गुगलने मायक्रोसॉफ्टचा सरफेस प्रो आणि अॅपलच्या आयपॅड प्रो या मॉडेल्सला तगडे आव्हान उभे केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.