जॅम सिटी या कंपनीने मनोरंजनाच्या क्षेत्रातील आघाडीचे नाव असणार्या वॉर्नर ब्रदर्सच्या सहकार्याने हॅरी पॉटर्स : होगवॉट मिस्ट्री या नावाने नवीन गेम लाँच केला आहे. हॅरी पॉटर मालिकेबाबत कुणाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ब्रिटनच्या जे. के. रोलिंग या लेखीकेने या मालिकेत लिहलेल्या पुस्तकांना जगभरात उदंड प्रतिसाद लाभला आहे. यावर आधारित चित्रपटांनीही रग्गड धंदा केला आहे. खरं तर हॅरी पॉटरशी संबंधीत अनेक स्मार्टफोन गेम्सदेखील आधीच उपलब्ध आहेत. यात आता हॅरी पॉटर्स : होगवॉर्ट मिस्ट्री या नवीन गेमची भर पडणार आहे. हा गेम अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीमच्या युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. हा गेम मोफत असला तरी, यात इन-अॅप परचेसींगची सुविधा आहे. अर्थात यातील हायर लेव्हलसाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत.
हॅरी पॉटर्स : होगवॉर्ट मिस्ट्री हा गेम खेळणार्यांना होगवॉट विचक्रॉफ्ट स्कूलमधील जादूई वातावरणाची अनुभूती घेता येणार आहे. यात युजर विविध प्रकारच्या जादूई ट्रिक्स शिकू शकेल. तसेच गेमरला हॉगवॉट स्कूलमधील विविध रहस्यांनी तुडूंब भरलेल्या प्राचीन दालनांमध्ये मुशाफिरी करता येणार आहे. येथे त्यांना अपप्रवृत्तींशी दोन-हात करण्याची संधीदेखील मिळणार आहे. यामध्ये विविध साहसांसाठी वेगवेगळ्या लेव्हल्स असणार आहेत. यात गेमरला स्वत:चा अवतार निवडण्यासह विविध पात्रे निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय गेमर आपल्याला हवा तो प्रोफेसर, मित्र, घर आदींना निवडू शकणार आहे. यासोबत मॅजिक स्पेल्स, पोझिशन्स आदींनाही निवडता येईल. अर्थात गेमरला या जादूई शाळेतील विद्यार्थी बनून अनेक चित्तथरारक बाबींना येथे अनुभवता येणार आहे. यामुळे हा गेम रोमांचकारी साहसाची आवड असणार्यांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.
पाहा:- हॅरी पॉटर्स : होगवॉर्ट मिस्ट्री गेमचा ट्रेलर
अधिकृत संकेतस्थळ :-http://www.harrypotterhogwartsmystery.com
डाऊनलोड लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.tinyco.potter&hl=en