हॉटस्टार या ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेने आपल्या मूल्यात कपात केली असून आता कुणीही १२०० रूपये प्रति-वर्ष इतक्या दराने याचा लाभ घेऊ शकतो.
भारतीय बाजारपेठेत ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या सेवांमधील स्पर्धा तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स आदींसह हॉटस्टार ही भारतीय कंपनी यात अग्रेसर आहे. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध कंपन्या अतिशय आकर्षक प्लॅन्स सादर करत आहेत. यात आता हॉटस्टारने आपल्या सबस्क्रीप्शनच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे. सद्यस्थितीत कुण्याही नवीन ग्राहकाला हॉटस्टार ही सेवा दरमहा १९९ रूपये इतक्या दराने पाहता येते. त्याला फक्त पहिल्या महिन्यात मोफत या सेवेचा आनंद घेता येतो. आता मात्र हॉटस्टारने एकदा वार्षीक वर्गणी भरल्यास १२०० रूपये आकारण्याची घोषणा केली आहे. तर नवीन इफेक्टीव्ह प्राईसच्या अंतर्गत दरमहा १०० रूपये या दरानेही हॉटस्टार सेवेचा लाभ घेता येणार आहे. सध्या अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवा ही सर्वात स्वस्त असून याचे मूल्य ९९९ रूपये प्रति-वर्ष इतके आहे. तर नेटफ्लिक्सचे विविध प्लॅन्स हे तुलनेत महाग असून ते ५०० रूपये प्रति-महिना या दरापासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमिवर हॉटस्टारने मध्यममार्ग काढल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश ऑनलाईन स्ट्रीमिंग सेवांमध्ये उत्तमोत्तम कंटेंटला प्राधान्य दिले जात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तथापि, सद्यस्थितीत याबाबत नेटफ्लिक्स आघाडीवर आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओवरही विपुल प्रमाणात वैविध्यपूर्ण व्हिडीओज आहेत. तर हॉटस्टारवर मनोरंजनाच्या जोडीला लाईव्ह सामन्यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थात यावर चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांसोबत विविध क्रीडा प्रकारातील सामन्यांना अगदी रिअल टाईम स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. यामुळे हॉटस्टारला क्रीडा प्रेमींची वाढीव प्रमाणात पसंती मिळत आहे. यातच आता याच्या सबस्क्रीप्शनचे दर कमी करण्यात आल्याचा लाभदेखील या सेवेला होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.