एचटीसी यु ११ ची सफायर ब्ल्यू आवृत्ती
By शेखर पाटील | Published: July 27, 2017 06:19 PM2017-07-27T18:19:15+5:302017-07-28T19:28:23+5:30
एचटीसी कंपनीने आपल्या एचटीसी यु ११ या स्मार्टफोनची सफायर ब्ल्यू या रंगाची आवृत्ती सादर केली असून कंपनीच्या ई-स्टोअरवर याची नोंदणी सुरू झाली आहे.
एचटीसी कंपनीने आपल्या एचटीसी यु ११ या स्मार्टफोनची सफायर ब्ल्यू या रंगाची आवृत्ती सादर केली असून कंपनीच्या ई-स्टोअरवर याची नोंदणी सुरू झाली आहे.
गेल्या महिन्यात एचटीसी यु ११ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी ५१,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आला होता. ग्राहकांना चंदेरी आणि काळा या दोन रंगांमध्ये एचटीसी यु ११ खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला होता. यात आता सफायर ब्ल्यू या रंगाचा नवीन पर्याय सादर करण्यात आला आहे. एचटीसी कंपनीच्या ई-स्टोअरवरून याची अगावू नोंदणी सुरू झाली असून ३० जुलैपासून ग्राहकांना हे मॉडेल प्रत्यक्षात खरेदी करता येईल. यातील उर्वरित फिचर्स हे आधीप्रमाणेच असतील. अर्थात यात ५.५ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी (११४० बाय २५६० पिक्सल्स) क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. क्वॉलकॉम ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३५ या अद्ययावत प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम सहा जीबी रॅम तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबी इतके वाढवता येईल.
एचटीसी यु ११ हे सेल्फी स्पेशल कॅमेर्याने सज्ज मॉडेल आहे. उत्तम दर्जाचे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तर यातील रिअर कॅमेरा १२ अल्ट्रापिक्सल्स क्षमतेचा असेल. या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. यामध्ये थ्री-डी साऊंड प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभूती शक्य आहे.
एचटीसी यु ११ या मॉडेलमध्ये नाविन्यपूर्ण एज सेन्सर ही प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने टचस्क्रीन डिस्प्लेस स्पर्श न करतांनाही फक्त कडांना हाताने दाबून फोटो काढणे, कोणतेही अॅप कार्यान्वित करणे तसेच टेक्स्ट अथवा व्हॉईस मॅसेज पाठवता येतात. अर्थात हा स्मार्टफोन अतिशय सुलभपणे वापरता येतो.