हुआवे आणणार स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम
By शेखर पाटील | Published: May 3, 2018 08:20 AM2018-05-03T08:20:01+5:302018-05-03T08:20:01+5:30
स्मार्टफोनसह अन्य संगणकीय उपकरणांमधील आघाडीचे नाव असणार्या हुआवेने आता स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करण्याचे संकेत दिले आहेत.
स्मार्टफोनसह अन्य संगणकीय उपकरणांमधील आघाडीचे नाव असणार्या हुआवेने आता स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या जगभरातील स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉइड प्रणालीचा सर्वाधीक वापर केला जातो. याच्या खालोखाल आयओएसचा क्रमांक असला तरी या दोन्हींच्या मार्केट शेअरमध्ये प्रचंड तफावत आहे. अर्थात अँड्रॉइडच्या मिरासदारीला अॅपलची आयओएस प्रणाली टक्कर देऊ शकेल अशी आजची स्थिती नाही. अर्थात अँड्रॉइडच्या पहिला क्रमांकाला सध्या तरी धोका नसल्याची बाब उघड आहे. तथापि, आता हुआवे या मातब्बी चीनी कंपनीने स्वत:ची ऑपरेटींग प्रणाली विकसित करण्यास प्रारंभ केल्याची माहिती आता समोर आली आहे. हुआवे आणि या कंपनीचा ब्रँड असणार्या ऑनरने चीन, भारत व अमेरिकेसह अन्य राष्ट्रांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. यांचे स्मार्टफोन हे अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे आहेत. तथापि, अमेरिकेमध्ये लायसन्सींगच्या मुद्यावरून अनेक चीनी कंपन्यांवर तेथील सरकारची कडक नजर आहे. यातच आता अमेरिकन सरकारने याच कारणावरून झेडटीई या चीनी कंपनीचे लायसन्स रद्द केले आहे. हुआवेवरही भविष्यात या प्रकारची स्थिती ओढवू शकते. नेमक्या याच कारणामुळे हुआवेने आता अँड्रॉइड सोडून स्वत:ची ऑपरेटींग प्रणाली विकसित करण्यात सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. हुआवेने याला दुजोरा दिला नसला तरी नकारदेखील दिलेला नाही हे विशेष.
दरम्यान, विविध लीक्सच्या माध्यमातून हुआवेच्या या आगामी ऑपरेटींग सिस्टीमची माहिती समोर आली आहे. यानुसार ही प्रणाली लिनक्स या मुक्तस्त्रोत ऑपरेटींग सिस्टीमपासूनच विकसित करण्यात येत आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या प्रणालीच्या स्मार्टफोनवर अँड्रॉइडचे अॅप्सदेखील चालू शकणार आहेत. अर्थात अँड्रॉइडपासून पूर्णपणे विभक्त होण्याआधी हुआवे सावध पवित्रा घेत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. येत्या कालखंडात याबाबत कंपनीतर्फे अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.