नवी दिल्ली - जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमांमुळे भारताने जगात सर्वात जास्त मोबाइल फोन्स (हँडसेट्स) निर्माण करणाºया देशांत दुसरे स्थान पटकावले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’असे आयसीएचे राष्ट्रीय अध्यक्षपंकज मोहिंद्रू यांनी २८ मार्च रोजी सिन्हा व प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.आयसीएने या पत्रात मार्केट रिसर्च फर्मने आयएचएस, चीनचा नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिस्टिक्स आणि व्हिएतनाम जनरल स्टॅटिटिक्स आॅफिसकडून मिळविलेल्या माहितीचा हवाला दिला आहे. आयसीएच्या माहितीनुसार, भारतात मोबाइल फोन्सचे वार्षिक उत्पादन २०१४ मध्ये तीन दशलक्ष होते, ते २०१७ मध्ये ११ दशलक्ष गेले. २०१७ मध्ये भारताने जगात व्हिएतनामचे हँडसेट्स निर्मितीतील दुसºया क्रमांकाचे स्थान हिसकावून घेतले. फोन्स उत्पादनात वाढ झाल्यामुळे भारतात २०१७-२०१८ वर्षात डिव्हायसेसच्या आयातीत निम्म्यापेक्षा जास्त घट झाली. इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या फास्ट ट्रॅक टास्क फोर्सने भारतात २०१९ मध्ये ५०० दशलक्ष मोबाइल हँडसेट्सच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. या फोन्सची अंदाजे किंमत ४६ अब्ज अमेरिकन डॉलर असेल.
मोबाइल फोनच्या उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:20 AM