स्मार्टफोन अॅप्लीकेशन्सच्या वापरावर लक्ष ठेवून याचे विश्लेषण करण्यासाठी ख्यात असणार्या अॅप अॅनी या संस्थेने २०१७ मध्ये जागतिक पातळीवर अॅप वापराबाबतचा सविस्तर अहवाल नुकताच सादर केला आहे. २०१७च्या अखेरीस जगभरात १७५ अब्जांपेक्षा जास्त अॅप्स डाऊनलोड करण्यात आले आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे अॅप डाऊनलोड करण्यात भारतीयांनी अमेरिकन युजर्सला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत चीन देश पहिल्या क्रमांकावर आहे. जगात गेल्या वर्षी अॅप्लीकेशन्सचा वापर ५० टक्क्यांनी वाढला असला तरी भारतात हेच प्रमाण तब्बल २२५ टक्के इतके असल्याचे या अहवालात दर्शविण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की, जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये अॅपचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. एक तर नोटाबंदीनंतरच्या कालखंडात केंद्र सरकारने युपीआयवर आधारित डिजीटल पेमेंट प्रणालीचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला. यामुळे विविध अॅपचा वापर वाढला. तर दुसरीकडे मोबाईल उत्पादक कंपन्यांनी अनेक उत्तमोत्तम हँडसेट अत्यंत किफायतशीर दरात सादर करण्याचा सपाटा लावला आहे. रिलायन्स जिओने तर अगदी चकटफू जिओफोन सादर करत धमाल केली. याचाच कित्ता अन्य कंपन्यांनीही गिरवत अल्प मूल्यात हँडसेट सादर केले आहेत. याच्या जोडीला सेल्युलर कंपन्यांनी अत्यंत किफायतशीर दरात डाटा प्लॅन्स सादर केल्यामुळे स्मार्टफोन्सचा आणि पर्यायाने अॅप्लीकेशन्सचा वापर वाढला आहे.
अॅप अॅनीच्या अहवालानुसार प्रत्येक भारतीय युजरकडे सरासरी ८० अॅप असून यातील निम्मे म्हणजे ४० अॅप ते सातत्याने वापरत असतात. चीन आणि जपानमध्ये यापेक्षा जास्त म्हणजेच सरासरी १०० अॅप वापरात असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र एकंदरीत संख्येचा विचार केला असता अॅप डाऊलोड करण्यात भारताचा क्रमांक आता चीननंतर लागत असून अमेरिका तिसर्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तथापि, अॅप वापराचा विचार केला असता भारत इतर देशांच्या खूप मागे आहे. भारताचा या यादीत ३०वा क्रमांक लागतो. भारतातील टॉप-१० अॅपमध्ये व्हाटसअॅप, फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, ट्रुकॉलर, शेअरइट, एमएक्स प्लेअर, युसी ब्राऊजर, अमेझॉन, पेटीएम आणि इन्स्टाग्राम आदींचा समावेश आहे. यातील पेटीएम हे एकमेव भारतीय अॅप असल्याची बाब लक्षणीय आहे. तर उर्वरित अन्य ९ अॅप्स हे विदेशी आहेत.