आयव्हुमी कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप आणि फुल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले असणारे आयव्हुमी आय१ आणि आय१एस हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
आयव्हुमी कंपनीने आजवर किफायतशीर मूल्यातील बाजारपेठेवरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आयव्हुमी आय१ आणि आय१एस हे दोन मॉडेल्सदेखील याच वर्गवारीतील आहेत. यातील बहुतांश फिचर्स समान असून फक्त रॅम आणि इनबिल्ट स्टोअरेज भिन्न आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे मागच्या बाजूस असणारा ड्युअल कॅमेरा सेटअप होय. याच्या अंतर्गत ऑटो-फोकस आणि फ्लॅशयुक्त १३ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यातील दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे फुल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले होय. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
आयव्हुमी आय१ आणि आय१एस या दोन्ही मॉडेल्समध्ये क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७व्ही हा प्रोसेसर देण्यात आला आहे. आयव्हुमी आय१ या मॉडेलची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असेल. तर आयव्हुमी आय१एस स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज असेल. या दोन्ही मॉडेल्समध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. तर या दोन्हींमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. आयव्हुमी आय१ आणि आय१एस या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसह फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.
आयव्हुमी आय१ आणि आय१एस या स्मार्टफोन्सचे मूल्य अनुक्रमे ५,९९९ आणि ७,४९९ रूपये असून ग्राहकांना ते फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येईल.