लेनोव्हो कंपनीने आपला के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात केली असून यासोबत विविध सवलती प्रदान केल्या आहेत. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन गेल्या सप्टेबर महिन्यात ग्राहकांसाठी १०,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. यात आता एक हजार रूपयांची कपात करण्यात आली असून हे मॉडेल ग्राहकांना ९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. ही कपात फक्त ३ जीबी व्हेरियंटसाठी देण्यात आलेली असून हे मॉडेल व्हेनम ब्लॅक आणि फाईन गोल्ड या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यासोबत कंपनीने अनेक आकर्षक सवलती दिल्या आहेत. यात ९,००० रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. तसेच ४१७ वा ४८५ रूपये प्रती महिना या दराने विना व्याजी इएमआयच्या माध्यमातूनही या स्मार्टफोनला खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतात.
लेनोव्हो के ८ प्लसमध्ये ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक हेलिओ एक्स २५ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यात तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते वाढविण्याची सुविधा आहे. लेनोव्हो के ८ प्लस या मॉडेलमध्ये फुल एचडी क्षमतेचा (१०८० बाय १९२० पिक्सल्स) आणि ५.२ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेर्याने सज्ज आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील पहिल्यात प्युअरसेल प्लस सेन्सर तर दुसर्यात डेप्थ सेन्सर असेल. यात छायाचित्रांना बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा दिलेली आहे. तर यात ८४ अंशातील अँगलसह ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात प्रो आणि ब्युटी मोड या फिचर्ससह पार्टी फ्लॅशची सुविधादेखील देण्यात आली आहे. लेनोव्हो के ८ प्लस हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारे असून यामध्ये टर्बो चार्जींगच्या सुविधेने सज्ज असणारी ४,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असून यात डॉल्बी अॅटमॉस, थिएटर मॅक्स आदी प्रणाली दिलेल्या आहेत.