शाओमी Mi TV 6 सीरीज 28 जूनला चीनमध्ये लाँच करणार आहे. लाँच करण्यापूर्वी कंपनीने या स्मार्ट टीव्ही सीरीजचे फीचर्स टीज केले आहेत. यात टीव्हीच्या डिस्प्ले आणि गेमिंग सपोर्टेड फीचर्सचा समावेश करण्यात आला होता. आता कंपनीने या टीव्हीच्या कॅमेऱ्याची माहिती सांगितली आहे. या टीव्हीमध्ये एक नव्हे तर दोन कॅमेरा असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, Mi TV 6 मध्ये कंपनी 48 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देणार आहे. एवढा जास्त रिजोल्यूशन असलेला कॅमेरा टीव्हीसोबत देण्याची हि पहिलीच वेळ आहे. याआधी हायएन्ड टीव्हीमध्ये 2 किंवा 4 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जात असे. एवढेच नव्हे तर शाओमी मी टीव्ही 6 जगातील पहिला टीव्ही असेल जो ड्युअल कॅमेऱ्यासह येईल. या टीव्हीमध्ये 48 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा असेल, ही माहिती सर्वप्रथम gizmochina ने लीक पोस्टरच्या आधारावर दिली आहे.
कंपनीने नुकतेच एक पोस्टर शेअर केला होता. त्यात टीव्हीचा वरचा भाग दाखवण्यात आला होता. यात एक पॉप-अप कॅमेरा सेटअप दिसत आहे. हा 48 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, जो कि मी टीव्ही 6 मध्ये देण्यात येईल. याआधी कंपनीने फ्लॅगशिप Mi TV 6 मधील 4K डिस्प्ले आणि 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेटची माहिती दिली होती. Xiaomi Mi TV 6 चीनमध्ये 28 जूनला सादर केली जाईल. परंतु इतर ठिकाणी ही टीव्ही कधी लाँच केली जाईल याची माहिती देण्यात आली नाही.